कतारकडून पाकिस्तानात तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा

तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणादोहा – परकीय गंगाजळी आठ अब्ज डॉलर्सच्याही खाली घसरलेली असताना, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मित्रदेशांकडे सहाय्यासाठी हात पसरत आहेत. यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ कतारचा दौरा केला होता. त्यांच्या आवाहनाला कतारने प्रतिसाद दिला असून पाकिस्तानात सुमारे तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा कतारने केली आहे. याचा फार मोठा लाभ आपल्या अर्थव्यवस्थेला मिळेल, असा दावा पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी केला आहे.

तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणापाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांची कतारचे अमिर शेक तमिम बिन हमाद अल थानी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेनंतर कतारकडून पाकिस्तानात सुमारे तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. सध्या पाकिस्तानच्या तिजोरीत आठ अब्ज डॉलर्सहून कमी रक्कम असून याने काही आठवड्यांच्या आयातीचे बिल चुकते करता येईल. त्याच्यानंतर पाकिस्तानला भयंकर स्थितीचा सामना करावा लागला असतात. या पार्श्वभूमीवर कतारने सदर गुंतवणुकीची घोषणा करून पाकिस्तानला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. आपल्या सर्वच मित्रदेशांकडे कर्ज आणि गुंतवणुकीसाठी हात पसरून पाकिस्तान आपल्यावरील आर्थिक संकटाचे निवारण करू पाहत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी देखील पाकिस्तानला सुमारे एक अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्याची तयारी केली आहे. यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पुढाकार घेतला होता. अमेरिकेपासून आखाती देशांपर्यंत जनरल बाजवा यांंनी मध्यस्थी केल्याने पाकिस्तानला कर्जसहाय्य मिळू लागले आहे, असे दावे केले जातात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी यासाठी पाकिस्तानच्या सरकारवर सडकून टीका केली होती.

तीन अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणाआखाती देशांसह पाकिस्तान अर्थसहाय्यासाठी अमेरिकेकडे याचना करीत आहे. अर्थसहाय्याच्या मोबदल्यात अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्याचीही तयारी पाकिस्तानने दाखविली असून अमेरिकेच्या काही मागण्या पाकिस्तानने मान्य देखील केल्याचे आरोप होत आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला चढवून अल कायदाचा प्रमुख जवाहिरी याला ठार केले होते. यासाठी पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यात आल्याचा दावा केला जातो. तसेच पाकिस्ताननेच जवाहिरीची माहिती अमेरिकेला पुरविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे खवळलेल्या अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले पाकिस्तानला सहन करावे लागतील, अशी चिंता या देशातील विश्लेषक व्यक्त करीत आहेत. तसेच सध्या अफगाणिस्तानच्या सीमेजळील भागात तालिबानच्या वाढत्या हालचली हा याचाच परिपाक असल्याचे बोलले जाते.

आर्थिक सहाय्यासाठी अमेरिकेबरोबर हातमिळवणी करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणाचे चीनकडूनही पडसाद उमटत असून चीन यासाठी पाकिस्तानवर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचवेळी आखाती देशांचा एक गट सतत कर्जासाठी हात पसरणाऱ्या पाकिस्तानवर वैतागल्याच्या बातम्या पाकिस्तानच्याच माध्यमांनी दिल्या होत्या. अशा परिस्थितीत कतारकडून मिळत असलेली तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काही काळासाठी पाकिस्तानच्या समस्या दूर करील. पण पुढच्या काळात पाकिस्तानला याहूनही अधिक गंभीर अशा आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल, असे स्पष्टपणे दिसते आहे.

leave a reply