अमेरिका व युरोपिय देशांनी इराणबरोबरील ‘वाईट’ अणुकरारातून माघार घ्यावी

- इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड

अणुकरारातून माघारजेरूसलेम – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच आखलेल्या ‘रेड लाईन्स’चे उल्लंघन इराण करीत आहे. त्यामुळे अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबरील अणुकरारातून माघार घ्यायला हवी, असे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी केले आहे. अणुकरारामुळे इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखता येईल, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला आहे. ही आपली रेड लाईन असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला होता. आमच्या मते इराणने ही रेड लाईन कधीच खोडून टाकलेली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी हा अणुकरार रद्द करणे, ही अगदी स्वाभाविक बाब ठरते, अशा शब्दात इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची भूमिका मांडली.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींसमोर पंतप्रधान लॅपिड बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व युरोपिय देश इराणबरोबरील अणुकरार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत देत आहेत. यातील काही मुद्यांवर इराणने आक्षेप नोंदवून त्यात फेरफार करण्याची मागणी केली होती. युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी याची कबुली दिलेली आहे. त्याचा दाखला देऊन इराणच्या मागणीनुसार अणुकरारावरील आराखड्यात केले जात असलेले बदल खपवून घेता येणार नाही. अण्वस्त्रांबाबत अमेरिका व युरोपिय देशांनी आखलेली ही मर्यादारेषा मान्य न करता इराण ती खोडून टाकत आहे. अशा परिस्थितीत इराणबरोबरील अणुकरारातून पाश्चिमात्य देश माघार का घेत नाहीत, असा प्रश्न इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला.

अणुकरारातून माघारइस्रायल इराणबरोबरील अणुकराराच्या विरोधात नाही, पण हा अणुकरार अतिशय वाईट आहे, म्हणून इस्रायल त्याला विरोध करीत आहे. या अणुकरारानुसार इराणला निर्बंधांतून मुक्त केले, तर हा देश आपल्याला व्यापारातून मिळणाऱ्या निधीचा गैरवापर करील. आखातात अस्थैर्य माजवून जगभरातील दहशतवाद्यांना प्रोत्साहन देईल. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील विचारवंत, लेखकांची हत्या घडविणाऱ्यांना पैसे पुरविल. इतकेच नाही, तर या पैशांचा वापर इराणी जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या इराणच्या बसिज यंत्रणेला अधिक बळ पुरविण्यासाठी केला जाईल. हिजबुल्लाह, हमास आणि इस्लामिक जिहाद सारख्या दहशतवादी संघटनांची ताकद वाढविण्यासाठी इराणला मिळालेल्या निधीचा वापर होऊन यामुळे अमेरिकेचे आखाती क्षेत्रातील तळ धोक्यात येतील, असा इशारा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला.हे सारे लक्षात आणून देत असताना, इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिका व युरोपिय देशांवर थेट टीका करण्याचे टाळले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे इस्रायलचे निकटतम मित्र असल्याचा निर्वाळा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला. सध्या इस्रायल अणुकरारावरील मतभेदांवर अमेरिकेशी चर्चा करीत असल्याची माहिती लॅपिड यांनी दिली. मात्र अमेरिका व युरोपिय देशांवर थेट टीका करण्याचे टाळले तरी ते इराणबरोबर करीत असलेला अणुकरार इस्रायल स्वीकारणार नाही, हा संदेश पंतप्रधान लॅपिड यांनी सौम्य शब्दात दिलेला आहे. तसेच या अणुकराराच्या संभाव्य परिणामांची जाणीवही त्यांनी पाश्चिमात्यांना करून दिलेली आहे.

दरम्यान, केवळ इस्रायलच नाही तर आखाती देश देखील इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्यावर पाश्चिमात्य देशांकडे आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. यामुळे आखाती क्षेत्रात इराणविरोधात आघाडी उभी राहत असून यासाठी अरब-आखाती देश इस्रायलबरोबरील सहकार्य वाढवित आहेत. काही आखाती देशांनी तर इस्रायलबरोबर संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. तरीही इराणबरोबर अणुकरार पुढे रेटण्याची तयारी बायडेन यांच्या प्रशासनाने केलेली आहे. यामुळे अमेरिकेचा आखाती देशांवरील प्रभाव व या क्षेत्रातील अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात येऊ शकतात. अमेरिकन विश्लेषक सातत्याने याची जाणीव करून देत आहेत.
म्हणूनच इराणबरोबरील अणुकरारासंदर्भात इस्रायलसह इराणच्या विरोधात उभे राहत असलेल्या आखाती देशांनी स्वीकारलेली ठाम भूमिका अमेरिकेसाठी आव्हानात्मक बाब ठरू शकते.

leave a reply