संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व्हिएतनामच्या भेटीवर

हानोई – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या व्हिएतनाम भेटीवर आहेत. ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीनच्या वर्चस्ववादी कारवाया तीव्र झालेल्या असताना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची ही व्हिएतनाम भेट लक्ष वेधून घेणारी ठरते. नेमक्या याच वेळी भारतीय नौदलाची विनाशिका ‘आयएनएस सातपुडा’ साऊथ चायना सीच्या क्षेत्रात असल्याच्या बातम्या येत आहेत.

rajnath-singhचीनच्या विस्तारवादी धोरणांपासून धोका असलेल्या देशांमध्ये व्हिएतनामचा समावेश आहे. व्हिएतनामच्या सागरी क्षेत्रावर चीनने दावा सांगितला असून यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद पेटलेला आहे. अशा परिस्थितीत व्हिएतनामने अमेरिका व युरोपिय देशांबरोबर सहकार्य वाढविले आहे. तसेच असियानचे सदस्य असलेल्या आग्नेय आशियाई देशांची एकजूट करून बलाढ्य चीनला रोखण्यासाठी व्हिएतनामने पावले उचललीआहेत. याबरोबरच जपानबरोबरील सहकार्य वाढवून व्हिएतनाम चीनच्या आव्हानाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत व्हिएतनामचे भारताबरोबरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

गेल्या काही वर्षांपासून व्हिएतनामने भारताबरोबरील सर्वच आघाड्यांवरील सहकार्य व्यापक करण्यासाठी पावले उचलली आहेत. भारताबरोबरील व्हिएतनामचे संरक्षणविषयक सहकार्य चीनला चांगलेच खुपत आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षणमंत्र्याची ही व्हिएनाम भेट चीनसाठी संवेदनशील बाब ठरू शकते. आपल्या तीन दिवसांच्या या भेटीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांची भेट घेऊन व्हिएतनामच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षणविषक सहकार्य तसेच धोरणात्मक भागीदारी अधिकच व्यापक करण्याचा प्रयत्न संरक्षणमंत्री राजनाथ सिंग करतील.

या भेटीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भारताने विकसित केलेल्या 12 अतिवेगवान बोटी व्हिएतनामला हस्तांतरीत करतील. भारताने व्हिएतनामला 10 कोटी डॉलर्स इतके कर्जसहाय्य पुरविले आहे. याच्या अंतर्गत व्हिएतनाम भारताकडून संरक्षणसाहित्याची खरेदी करीत आहे. दोन्ही देशांमधील या व्यवहाराची व्याप्ती पुढच्या काळात अधिक वाढेल, असा दावा केला जातो. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी व्हिएतनाम उत्सूक असल्याच्या बातम्या काही काळापूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

leave a reply