चीनने ऑस्ट्रेलियाला गंभीर परिणामांचा इशारा दिला

australia china jetsबीजिंग – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात टेहळणी करीत असलेल्या ऑस्ट्रेलियन विमानावर चीनच्या लढाऊ विमानाने ‘फ्लेअर्स’चा मारा केला होता. रविवारी झालेल्या या घटनेवर ऑस्ट्रेलियाची जहाल प्रतिक्रिया आली होती. ही बाब अतिशय घातक ठरेल, असा इशारा ऑस्ट्रेलियाने चीनला दिला होता. मात्र त्याची पर्वा न करता चीनने ऑस्ट्रेलियालाच धमकावले आहे. वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करून चीनच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असे चीनने म्हटले आहे.

zhao lijianसाऊथ चायना सी‘च्या बहुतांश सागरी तसेच हवाईहद्दीवर चीन आपला दावा सांगत आहे. यासाठी व्हिएतनाम, फिलिपाईन्स, तैवान, ब्रुनेई आणि इंडोनेशिया या आग्नेय आशियाई देशांचा दावाही चीनने फेटाळला आहे. तसेच येथील आंतरराष्ट्रीय सागरी किंवा हवाईहद्दीतून प्रवास करणाऱ्या परदेशी युद्धनौका किंवा विमानांना चीनने धमकावले आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन विमानाच्या बाबतही असाच प्रकार घडला.

chinese-j-1626 मे रोजी येथील आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रातून ऑस्ट्रेलियाच्या ‘पी-8′ या टेहळणी विमानाने प्रवास केला. चीनने ‘जे-16′ लढाऊ विमान रवाना केले. चीनच्या या विमानाने आपल्या विमानाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया करीतआहे. चीनच्या लढाऊ विमानाने ऑस्ट्रेलियन टेहळणी विमानाच्या मार्गात येऊन ‘फ्लेअर्स’चा मारा केला. यातून बाहेर पडलेले ॲल्युमिनिअमचे छोटे तुकडे ‘पी-8’च्या इंजिनमध्ये अडकल्याचा दावा ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी केला.

या आरोपांमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने ऑस्ट्रेलियाला ‘विवेकाने वर्तन करा, अन्यथा गंभीर परिणामांना तयार रहा’, अशी धमकी दिली आहे. ‘ऑस्ट्रेलियाने चीनचे सुरक्षाविषयक हितसंबंधांचा आदर राखावा. अन्यथा वाहतुकीच्या स्वातंत्र्याच्या आड चीनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेणार नाही’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी धमकावले. दरम्यान, गेल्या दोन वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया व चीनच्या संबंधामधील तणाव वाढला आहे. जागतिक व्यापार परिषदेत (डब्ल्यूटीओ) ऑस्ट्रेलियाने नोंदवलेल्या तक्रारीनंतर चीनबरोबरचे संबंध बिघडले आहेत. पुढच्या काळात चीनने ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केल्याचे आरोप झाले होते. चीनने ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असलेल्या पॅसिफिक बेटदेशांबरोबर सुरक्षाविषयक करार करण्यास सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाने या शेजारी बेटदेशांशी संपर्क साधून चीनच्या डावपेचांना काटशह दिला. यामुळे चीन अधिकच अस्वस्थ बनल्याचे दिसत आहे.

leave a reply