जगभरातील हजारो सर्व्हर्सवर रॅन्समवेअर हल्ला

- इटलीच्या ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी’ दावा

रोम – उत्तर अमेरिका, युरोपसह इतर काही देशांमधील हजारो सर्व्हर्सवर रॅन्समवेअर हल्ला झाला. यामुळे सदर सर्व्हर्समधील अँटी व्हायरस सॉफ्टवेअरच्या मर्यादा उघड झाल्याचे इटलीच्या नॅशनल सायबर सुरक्षा संस्थेने (एसीएन) म्हटले आहे. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांनी कितीही दावे केले तरी आपले सर्व्हर्स सुरक्षित नाहीत, हे या रॅन्समवेअर हल्ल्यातून स्पष्ट झाल्याचा टोला ‘एनसीएन’ने लगावला. दरम्यान, या वर्षी जगाला आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर कॅटास्ट्रोफी अर्थात सायबर संकटाला सामोरे जावे लागेल, असे काही दिवसांपूर्वीच सायबर तज्ज्ञांनी बजावले होते.

साऱ्या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे लागलेले असताना जगभरातील विकसित देशांमधील सर्व्हर्सवर हा सायबर हल्ला झाला. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इटली, फिनलँड व इतर काही देश या सायबर हल्ल्यांचे लक्ष्य होते, अशी माहिती इटलीच्या एसीएनने दिली. या सायबर रॅन्समवेअर हल्ल्यामध्ये संबंधित देशांच्या उद्योगक्षेत्रातील कंपन्यांच्या सर्व्हर्सना टार्गेट करण्यात आले आहे. मात्र सरकारी किंवा प्रशासकीय सर्व्हर्सना या हल्ल्यातून वगळण्यात आल्याचे इटलीच्या आघाडीच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

फ्रान्समध्ये सर्वात आधी या सायबर हल्ल्याची नोंद झाली. ‘एएनएसएसआय’ या फ्रेंच सायबर सुरक्षा संस्थेने देखील रॅन्समवेअर हल्ल्यांपासून इतर देशांना सावध केले. तर इटलीमधील २० हून अधिक कंपन्यांचे सर्व्हर्स यामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी या रॅन्समवेअर हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील सायबर सुरक्षा कंपन्या या सायबर हल्ल्यांमागील कारणे आणि स्त्रोतांचा शोध घेत असल्याचे अमेरिकेच्या सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

या रॅन्समवेअर हल्ल्यामागे कुठलाही देश नसल्याचे इटलीच्या एसीएनने म्हटले आहे. पण येत्या काळात असे सायबर हल्ले तीव्र होतील, असे इटली तसेच फ्रेंच यंत्रणा बजावत आहेत. २०२२ साली जगभरातील सायबर हल्ल्यांची संख्या भयावहरित्या वाढली होती, असे अहवालातून उघड झाले होते. पण २०२३ सालातील सायबर हल्ले अधिक भयावह असतील, असा इशारा वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत सायबर तज्ज्ञांनी दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या व आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉटचा वापर करून आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला घडविला जाऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

leave a reply