लिबियातील सत्तासंघर्षात बंडखोरांची पिछेहाट

त्रिपोली – राजधानी त्रिपोलीमधून बंडखोरांना पिटाळून लावल्यानंतर लिबियाच्या लष्कराने शुक्रवारी तरहुन या शहराचाही ताबा घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेल्या लिबियन सरकारला मिळालेला हा फार मोठा विजय मानला जातो. त्याचवेळी गेल्या चौदा महिन्यांपासून लिबियाची राजधानी त्रिपोली ताब्यात घेण्यासाठी घनघोर संघर्ष करणाऱ्या बंडखोर लष्करी नेते हफ्तार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जातो. तरहुन येथील विजय निर्णायक असल्याचा दावा करून लिबियन सरकार व सरकार समर्थक गट जल्लोष करीत आहेत. मात्र लिबियाच्या पूर्व तसेच दक्षिणेकडील इंधन संपन्न भागावर अजूनही बंडखोर नेते हफ्तार यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे हा संघर्ष इतक्यात संपणार नाही,असा दावा काही विश्लेषक करीत आहेत.

लिबिया बंडखोर

लिबियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा पाठिंबा असलेले ‘गव्हर्मेंट ऑफ नॅशनल अकोर्ड’ सत्तेवर आहे. मात्र लिबियाचे लष्करप्रमुख जनरल हफ्तार यांनी या सरकारला आव्हान देऊन लष्करी उठाव केला. संयुक्त अरब अमिरात आणि इजिप्त या देशांचे समर्थन मिळालेल्या हफ्तार यांच्यामागे रशियानेही आपले पाठबळ उभे केले होते. आखाती देशात सक्रिय असलेली कट्टर संघटना इस्लामी ब्रदरहूड देखील हफ्तार यांच्या पाठीमागे उभी असल्याचे दावे केले जातात. याच्या बळावर हफ्तार यानी लिबियन लष्कराच्या एका मोठ्या गटाला हाताशी धरून संयुक्त राष्ट्र संघाने पाठिंबा दिलेल्या सरकारला आव्हान दिले होते.

लिबियाच्या दक्षिण व पूर्व भागावर हफ्तार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या दिशेने हफ्तार यांच्या बंडखोर साथीदाराने आगेकूच सुरू केली होती व गेल्या चौदा महिन्यांपासून राजधानी त्रिपोली ताब्यात घेण्यासाठी या बंडखोरांनी भयंकर संघर्ष सुरू ठेवला होता. हफ्तार यांच्या बाजूने रशियाचे कंत्राटी सैनिक लढत असल्याचे आरोप झाले होते. तर लिबियन सरकारला वाचवण्यासाठी तुर्कीने लष्करी हस्तक्षेप केल्याचे समोर आले होते. पण आता या संघर्षाचे पारडे फिरले असून राजधानी त्रिपोली इथून बंडखोरांना पिटाळण्यात लिबियन लष्कर व समर्थक गटाला यश मिळाले आहे.

लिबिया बंडखोर

इतकेच नाही तर शुक्रवारी लिबियाच्या तरहुन या शहराचा ताबा लिबियन लष्कराने घेतला आहे. तरहुनचा वापर करूनच हफ्तार यांचे समर्थक त्रिपोली ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होते. पण आता या बंडखोरांनी इथून माघार घेतल्यानंतर लिबियन सरकारला फार मोठा विजय मिळाल्याचे मानले जात आहे. राजधानी त्रिपोलीमध्ये या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. पुढच्या काळात लिबियातील बंड पूर्णपणे मोडून काढण्यात येईल, अशा घोषणा लिबियन सरकारकडून दिल्या जात आहेत. मात्र ही बाब तितकीशी सोपी नाही, याकडेही काही विश्लेषक लक्ष वेधत आहेत. लिबियाच्या पूर्वेकडील तसेच इंधन संपन्न दक्षिणेकडील भागावर अजूनही हप्तार यांचे नियंत्रण आहे. या भागात बंडखोरांशी संघर्ष करणे लिबियन लष्कराला अवघड जाईल. हफ्तार यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या रशियाकडून तसे होऊ दिले जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ही सांगत आहेत. त्यामुळे लिबियात सुरू असलेला रक्तरंजित सत्तासंघर्ष नजिकच्या काळात थांबण्याची शक्यता नाही. उलट पुढच्या काळात हा संघर्ष अधिकच तीव्र होईल असे वृत्तसंस्थाचे म्हणणे आहे.

leave a reply