कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारत पाचव्या स्थानावर   

कोरोनामुळे देशात चोवीस तासात सुमारे ३०० जणांचा बळी गेला, तर ९८०० हून अधिक नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील साथीने दागवलेल्यांची संख्या ६,६४२ वर पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या २,३६,६५७ झाल्याची माहिती शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. शनिवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीची रुग्णसंख्या दोन लाख ४४ हजारांच्याही पुढे गेल्याचे समोर येत आहे. यामुळे जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

गेल्याच आठवड्यात जगात कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानावर पोहोचला होता. मात्र पाच दिवसातच देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या सुमारे ४५ हजाराने वाढली असून कोरोनाची सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर आला आहे. इटली आणि स्पेन या देशांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावर दरदिवशी चार ते पाच हजार नवे रुग्ण सापडत होते. ते प्रमाण आता नऊ ते १० हजारांवर आले आहे.

 मात्र  भारतात कोरोनाचे संक्रमण फैलावण्याचा वेग कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) म्हटले आहे. पण त्याचवेळी सामूहिक संसर्ग सुरु झाल्यास विस्फोटक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम असल्याचा इशारा ‘डब्लूएचओ’ने दिला आहे.

शनिवारी महाराष्ट्रात आणखी १२० रुग्णांचा बळी गेला, तर २७३९ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ५८ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील या साथीने दगाविलेल्यांची संख्या तीन हजारांजवळ  आणि एकूण रुग्णांची संख्या ८३ हजारांवर पोहोचली आहे. दिल्लीत १३३० नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत १४५८ नवे रुग्ण आढळले असून या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला असला, तरी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४८.२० टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत १,१५,९४२ रुग्ण बरे झाले आहेत.

leave a reply