एसडीजीच्या आघाडीवर भारत क्षेत्राचे व जगाचे नेतृत्त्व करीत आहे

-संयुक्त राष्ट्रसंघाची प्रशंसा

संयुक्त राष्ट्रसंघ – 2015 संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 2030 सालासाठी 17 उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली होती. ही उद्दिष्टे (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स-एसडीजी) गाठण्यासाठी भारत आपल्या क्षेत्राचे आणि जगाचेही नेतृत्त्व करीत आहे, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपप्रमुख अमिना मोहम्मद यांनी भारत सरकार व नीति आयोगाची प्रशंसा केली. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघात बोलताना नीति आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी ही 17 उद्दिष्टे गाठण्यासाठी भारताने केलेल्या मोठ्या वेगाने केलेल्या प्रगतीचा दाखला दिला.

India-leading-sector‘गेल्या सहा ते सात वर्षात भारताने 33 कोटी इतक्या जनतेला स्वच्छ जीवनमानासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. 23 कोटी, 30 लाख जणांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळवून दिले. देशात 88 टक्क्यांवर असलेली वीजेची सुविधा 97 टक्क्यांवर नेली. याचा 18 कोटी, 30 लाखाहून अधिकजणांना लाभ मिळत आहे. भारताच्या आरोग्यसेवेचा लाभ 50 कोटी जणांपर्यंत विस्तारित करण्यात आलेला आहे. मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. भारतासारखी अफाट लोकसंख्या असलेल्या देशाने करून दाखविली ही प्रगती दोन गोष्टी साध्य करीत आहे’, असे सुमन बेरी म्हणाले.

या दोन गोष्टी म्हणजे जागतिक पातळीवर 17 उद्दिष्टे गाठण्याचे लक्ष्य भारताने अधिक सुलभ केले. त्याबरोबरच अमेरिकेइतक्या जनसंख्येला मोठे लाभ मिळवून देऊन, भारताने आपली क्षमताही सिद्ध केली, असे बेरी म्हणाल्या. त्याचवेळी कोरोनाची साथ आलेली असताना, भारताने केलेल्या कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याची आठवण सुमन बेरी यांनी करून दिली. कोरोनाची साथ आलेली असताना, भारताने या आव्हानाचा समर्थपणे मुकाबला केला, असे बेरी म्हणाले.

दरम्यान, 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 2030 सालासाठी सुमारे 17 उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली होती. यामध्ये गरीबीचे निर्मूलन, भूकेचे उच्चाटन, प्रत्येकासाठी आरोग्य व चांगले जीवनमान, चांगल्या दर्जाचे शिक्षण, लैंगिक समानता, स्वच्छ पाणी व स्वच्छता, परवडणारी व स्वच्छ ऊर्जा, सन्मान देणारे काम व आर्थिक प्रगती, उद्योग-संशोधन आणि पायाभूत सुविधा, विषमतेचे निर्मूलन, जनसामान्यांना परवडणारी शहरे व समाजिक व्यवस्था, जबाबदारीने केलेले उत्पादन व उत्पादनांचाही जबाबदार वापर, हवामानविषयक कर्तव्य, जलचरांचे संवर्धन, भूतलावरील जीवन, व्यवस्थांकडून शांती व न्याय, हे सारे साध्य करण्यासाठी भागीदारी- अशी एकूण 17 उद्दिष्टे गाठण्याचे आमसभेत मान्य करण्यात आले होते.

2030 सालापर्यंत हे ध्येय गाठण्यासाठी आता फारसा अवधी राहिलेला नाही. पण भारताने या आघाडीवर करून दाखविलेली प्रगती लक्षात घेऊन, भारताच्या या मॉडेलचा जगाने विचार करावा. स्थानिक पातळीवर या योजनांच्या अंमलबजावणीत भारताला मिळालेले हे यश लक्षणीयठरते, असे बेरी यांनी म्हटले आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपप्रमुख अमिना मोहम्मद यांनी भारत सरकार व नीति आयोगाची प्रशंसा केली. स्थानिक पातळीवर भारत सरकारने या योजना राबवताना केलेले नियोजन, खर्चाची आखणी व त्याची देखरेख प्रशंसनीय असल्याचे अमिना मोहम्मद यांनी म्हटले आहे.

leave a reply