रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये महागाईचा विक्रमी भडका

-जी7 देशांमधील उच्चांक

Russia-Ukraine-warलंडन – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील महागाईने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. मे महिन्यात ब्रिटनमधील महागाई निर्देशांक 9.1 टक्के असा नोंदविण्यात आला. ही मार्च 1982 नंतरची सर्वाधिक वाढ ठरली आहे. या नव्या वाढीमुळे जी7 गटातील देशांमध्ये सर्वोच्च महागाई निर्देशांक नोंदविणारा देश म्हणून ब्रिटनची नोंद झाली आहे. ब्रिटनमधील महागाई 11 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, असे भाकित विश्लेषक तसेच तज्ज्ञांनी वर्तविले असून ब्रिटीश जनतेला एकाच वेळी ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ व मंदीला तोंड द्यावे लागेल, असेही बजावले.

रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष्य करून युक्रेनवर हल्ला चढविणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना धडा शिकविण्याचा इशारा अमेरिका व ब्रिटनच्या नेतृत्त्वाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात पाश्चिमात्य देशांकडून लादलेले निर्बंध ‘बूमरँग’ होऊन त्यांच्यावरच उलटत असल्याचे दिसू लागले आहे. रशियावर निर्बंध लादणाऱ्या बहुतांश आघाडीच्या देशांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. ही महागाई पुढील काही महिन्यांपर्यंत कायम राहण्याचे संकेतही देण्यात आले असून त्यातून मंदी येऊ शकते, असेही दावे करण्यात येत आहेत.

Russia-Ukraine-war-inflationब्रिटनमध्ये महागाई निर्देशांक 9.1टक्क्यांवर गेल्याची नोंद झाली आहे. हा गेल्या 40 वर्षातील उच्चांक ठरला आहे. ब्रिटनमधील अन्नधान्य, फळे, इंधन यासह बहुतांश जीवनावश्यक उत्पादनांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य व फळांच्या किंमतींमध्ये 8.7 टक्क्यांची भर पडली आहे. वीजेच्या बिलांमध्ये सुमारे 20 टक्क्यांची भर पडल्याने जनतेतून तक्रारीचा सूर उमटू लागला आहे. ब्रिटनमधील इंधनाच्या दरांनीही उच्चांकी पातळी गाठली असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे.

सरकार महागाई रोखण्यासाठी योग्य पावले उचलत नसल्याची नाराजीची भावना तीव्र होत असल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत आहे. महागाई रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढीची उपाययोजना केली असली तरी त्याने महागाईत बदल झालेला नाही. उलट पुढील काळात महागाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. ब्रिटनकडून होणारी इंधन व ऊर्जेची आयात तसेच युरोपिय महासंघाबरोबरचा तणाव यामुळे देशाला आर्थिक स्तरावर अधिक मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

ब्रिटनमधील विक्रमी महागाईचे पडसाद ब्रिटनसह युरोपिय शेअरबाजारांमध्येही उमटले आहेत. बुधवारी ब्रिटनच्या ‘एफटीएसई100’सह अनेक निर्देशांकांमध्ये दीड ते दोन टक्क्यांची घसरण झाली.

leave a reply