क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्या दौऱ्यात सौदीचे जॉर्डन व तुर्कीशी सहकार्य करार

अम्मान/अंकारा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आखाती देशांच्या दौऱ्यावर येण्याआधी सौदी अरेबियाने मित्रदेशांबरोबरील तणाव कमी करण्याच्या तयारी केली आहे. यासाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान जॉर्डन व तुर्कीला भेट देत असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत.

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सोमवारी इजिप्तपासून या दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्यात उभय देशांमध्ये 7.7 अब्ज डॉलर्सचे 14 सहकार्य करार पार पडले. यानंतर प्रिन्स मोहम्मद मंगळवारी जॉर्डनमध्ये दाखल झाले. गेल्या काही वर्षांपासून सौदी व जॉर्डनच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, प्रिन्स मोहम्मद यांच्या या भेटीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिका व सौदी यांच्यात सहकार्य भक्कम झाले होते. त्यामुळे अमेरिकेचा आखातातील निकटतम सहकारी देश असलेला जॉर्डन दुखावला गेला होता. त्यातच वर्षभरापूर्वी राजे अब्दुल्लाह दुसरे यांचे सावत्र बंधू प्रिन्स हमझा यांनी बंडाळीचा कट आखल्याच्या बातम्या आल्या होत्या. काही तासांसाठी प्रिन्स हमझा यांना नजरकैदही झाली होती. प्रिन्स हमझा यांच्या बंडामागे सौदीचे पाठबळ असल्याचा आरोप जॉर्डनच्या यंत्रणांनी केला होता. यामुळे सौदी व जॉर्डनमधील संबंध ताणले गेले होते.

या पार्श्वभूमीवर, क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी जॉर्डनचा दौरा करुन उभय देशांमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे दिसत आहे. राजे अब्दुल्लाह दुसरे यांनी देखील सौदीच्या क्राऊन प्रिन्सना जॉर्डनचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. राजे अब्दुल्ला दुसरे आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीत सौदीने जॉर्डनसाठी आी जाहीर केलेली तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मोकळी करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर येत्या काळात जॉर्डनमध्ये नवी गुंतवणूक करणार असल्याचे संकेत सौदीने दिले आहेत.

दरम्यान, जॉर्डनच्या भेटीनंतर सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बुधवारी तुर्कीत दाखल झाले. पत्रकार जमाल खाशोगी यांची 2018 साली तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये हत्या घडविण्यात आली होती. यामागे सौदीचे क्राऊन प्रिन्स असल्याचा आरोप झाला होता. तुर्कीने हे प्रकरणअतिशय गंभीरपणे घेऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचा परिणाम तुर्कीच्या सौदीबरोबरील संबंधांवर झाला होता. त्यानंतरच्या काळात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्लामधर्मिय देशांचे नेतृत्त्व करणाऱ्या सौदी अरेबियावर टीकेची झोड उठविली होती. सौदी व युएई या देशांकडे असलेले इस्लाधर्मिय देशांचे नेतृत्त्व आपल्याकडे खेचून घेण्याची तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे त्यांच्या सौदीवरील टीकेची धार अधिकच वाढली होती.

मात्र या वर्षाच्या मार्च महिन्यात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सौदीचा दौरा करून संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली होती. त्याला सौदीकडूनही प्रतिसाद मिळत आहे. तुर्कीची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना सौदी व आखाती देशांचे सहाय्य हवे आहे. तर इंधनाचे उत्पादन वाढविण्यासाठी अमेरिका आपल्यावर टाकत असलेल्या दबावाला उत्तर देण्यासाठी सौदीला देखील इतर देशांचे सहाय्य अपेक्षित आहे.

यासाठीच क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी यासाठी इजिप्त, जॉर्डन आणि तुर्कीला भेट दिल्याचे दिसते आहे.

leave a reply