चीनची तैवानमधील घुसखोरी रोखण्यासाठी ‘ऑकस’ देशांचा ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव

वॉशिंग्टन – एफ-22 रॅप्टर्स, बी-2 बॉम्बर्स, युरोफायटर टायफून्स, ईए-18जी ग्रॉलर्स अशा प्रगत लढाऊ आणि बॉम्बर्स विमानांचा समावेश असलेला ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव नुकताच पार पडला. अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या ‘ऑकस’ देशांची लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाली होती. हा सराव कुठल्याही देशाविरोधात नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. पण येत्या काळात चीनने तैवानचा ताबा घेतलाच तर तैवानच्या मुक्ततेसाठी केल्या जाणाऱ्या कारवाईचा अभ्यास या सरावात केला गेला, असे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिकेच्या नेवाडा प्रांतात अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या हवाईदलाचा ‘रेड फ्लॅग’ युद्धसराव सुरू होता. अमेरिकेच्या हवाईदलातील एफ-22 रॅप्टर्स, बी-2 बॉम्बर्स विमानांबरोबरच एफ-35 बी स्टेल्थ लढाऊ विमाने आणि एफ-15, एफ-16, एफ-18 असा विमानांचा मोठा ताफा यात सहभागी झाला होता.

लांब पल्ल्यावरील लक्ष्य भेदणे आणि तीनही देशांच्या हवाईदलांमधील परस्पर समन्वय यावर रेड फ्लॅग युद्धसराव आधारलेला होता, अशी माहिती अमेरिकेच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी कर्नल जॅरेड जे. एचिंसन यांनी दिली.

हा युद्धसराव कोणत्याही देशाविरोधात नव्हता, असे कर्नल एचिंसन म्हणाले. पण ‘चीनपासून वाढत असलेल्या आव्हानांचा अभ्यास करुन आम्ही हा सराव करीत आहोत, असे कर्नल एचिंसन पुढे म्हणाले. तर येत्या काळात तैवानच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला तर अमेरिका चीनविरोधात भूमिका घेईल.

अशा परिस्थितीत, लांब पल्ल्याच्या हवाई मोहिमेसाठी अमेरिकेच्या लढाऊ विमानांना इंधन पुरविण्याचे काम ब्रिटनचे केसी-2 वोयजर विमान कशाप्रकारे पार पाडेल, याचा सरावही यावेळी करण्यात आला.

याबरोबरच तीनही देशांच्या वैमानिकांनी यावेळी एकमेकांच्या विमानांचाही अभ्यास केला. आगामी काळात तशीच परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्याची तयारी म्हणून अशाप्रकारच्या अभ्यासाचा समावेश या सरावात करण्यात आला आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली.

तसेच शत्रूच्या लढाऊ विमानांबरोबर हवाई सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देण्याचा सराव यावेळी करण्यात आला. तर सहकारी देशाच्या हद्दीत शत्रू देशाने घुसखोरी केलीच तर संबंधित सहकारी देशाच्या सहाय्यासाठी लढाऊ विमानांना कसे नेता येईल, यावर आधारीत सरावही पार पडल्याची माहिती, ब्रिटनच्या एअर मोबिलिटी फोर्सचे कमांडर कमोडोर जॉन लिले यांनी दिली.

दरम्यान, अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियन हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनचा थेट उल्लेख करण्याचे टाळले. असे असले तरी सदर सराव हा चीनची तैवानमधील घुसखोरी रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply