तुर्की व सिरियामधील भूकंपातील बळींची संख्या 33 हजारांवर

50 हजारांहून अधिक बळी गेल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा दावा

अंकारा – तुर्की व सिरियातील भूकंपातील बळींची संख्या 33 हजारांच्या पुढे गेली आहे. तर बळींची संख्या 50 हजारांच्याही पुढे जाऊ शकते, असा थरकाप उडविणारी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. तर तुर्कीत बचावकार्य करीत असलेल्या जर्मनीच्या पथकाने या ठिकाणी साथीचे रोग पसरू शकतात, असा इशारा दिला आहे. याबरोबरच तुर्की व सिरियातील भूकंपग्रस्तांना तात्पुरत्या स्वरुपाचा व्हिसा देण्याची तयारी जर्मनीने दाखविली आहे.

underwater droneतुर्की व सिरियामध्ये अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे. काहीजण पाच दिवसाहून अधिक काळ या ढिगाऱ्याखाली जिवंत राहिल्याची व आश्चर्यकारकरित्या बचावल्याच्या बातम्या येत आहेत. पण तुर्कीत विविध देशांची पथके बचावकार्य करीत असताना, त्याच्या तुलनेत सिरियातील बचावकार्य वेग घेत नसल्याचे समोर येत आहे. सिरियन राजवटीच्या विरोधकांच्या ताब्यात असलेल्या भागात बचावकार्याला अजूनही वेग मिळालेला नाही, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे.

रविवारच्या दुपारपर्यंत तुर्की व सिरियातील भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या 28 हजारांवर असल्याची माहिती दिली जात होती. पण संध्याकाळपर्यंत ही संख्या 33 हजारांच्याही पुढे गेल्याचे स्पष्ट झाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बचावपथकाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स्‌‍ यांनी दोन्ही देशांमधील भूकंपाच्या बळींची संख्या 50 हजारांच्याही पुढे जाऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली. अजूनही खऱ्या अर्थाने या भूकंपातील बळींची गणतीच सुरु झालेली नाही, असे सांगून कदाचित ही संख्या आपण दावा करीत आहोत, त्याच्याही पुढे जाऊ शकते, असे संकेत ग्रिफिथ्स्‌‍ यांनी दिले आहेत.

तर तुर्कीत बचावकार्य करीत असलेल्या जर्मनीच्या पथकाने इथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. भूकंपग्रस्तांना अजूनही पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व इतर सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे इथे रोगराई पसरू शकते, असा इशारा जर्मनीच्या बचावपथकाच्या प्रमुखांनी दिला. तर जर्मनीत वास्तव्य करणाऱ्या तुर्कवंशिय व सिरियन्सना दोन्ही देशातील भूकंपामुळे बाधित झालेल्या नातेवाईकांना जर्मनीचा तात्पुरता व्हिसा देण्याची घोषणा जर्मनीने केली. हे भूकंपग्रस्तांसाठी केलेले तात्पुरत्या स्वरुपाचे सहाय्य असल्याचा दावा जर्मनीने केला आहे.

जर्मनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या तुर्कवंशियांची संख्या 29 लाख इतकी असून यातील जवळपास अर्ध्या तुर्कवंशियांकडे तुर्कीचेही नागरिकत्त्व आहे. जर्मनीच्या माजी चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सिरियात गृहयुद्ध भडकल्यानंतर जर्मनीत येणाऱ्या सिरियन निर्वासितांना आश्रय देण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे जर्मनीतील सिरियन्सची संख्या साडेनऊ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तुर्की व सिरियातील भूकंपाने बाधित झालेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना जर्मनीतील हे तुर्की तसेच सिरियन्स काही काळासाठी जर्मनीत बोलावू शकतात, असे जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फायझर यांनी जाहीर केले. त्यासाठी त्यांना तात्पुरता व्हिसा दिला जाईल व हा भूकंपग्रस्तांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे फायझर यांनी म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply