बायडेन यांनी इराणबाबत जुन्या चुकांची पुनरावृत्ती करू नये

- इस्रायलचे अमेरिकेतील राजदूत

वॉशिंग्टन – अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबरचा अणुकरार पुन्हा जिवंत करण्याचे संकेत दिले आहेत. बायडेन यांच्या या भूमिकेवर इस्रायलकडून प्रतिक्रिया उमटली आहे. बायडेन यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत जुन्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, असे अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत रॉन डर्मर यांनी बजावले. इराणबरोबरचा अणुकरार पुन्हा सक्रीय केला तर ती विनाशकारी बाब ठरेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी दिला आहे.

चुकांची पुनरावृत्ती

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ज्यो बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते. ओबामा यांनीच २०१५ साली इराणबरोबर अणुकरार केला होता. ओबामा यांच्या या अणुकरारावर इस्रायल तसेच अरब देशांनी जोरदार टीका केली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये दिलेल्या भाषणातही सदर अणुकरारावर ताशेरे ओढताना, अमेरिकेच्या या निर्णयामुळे इराणच्या अणुकार्यक्रमापासून धोका असलेले देश इस्रायलशी सहकार्य करतील, असे बजावले होते.

चुकांची पुनरावृत्ती

तेव्हापासून अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत असणार्‍या डर्मर यांनी पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या त्या भाषणाची अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना आठवण करून दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायल आणि अरब देशांमधील सहकार्य सुधारले आहेत, याकडे डर्मर यांनी लक्ष वेधले. अशा परिस्थितीत, बायडेन यांचे नवे प्रशासन इराणबाबत सर्वमान्य निर्णयाचा विचार करतील आणि जुन्या चुकांची अर्थात इराणबरोबर पुन्हा अणुकरार करण्याची चूक करणार नसल्याचा खोचक टोला डर्मर यांनी लगावला.

चुकांची पुनरावृत्ती

डर्मर यांच्या पाठोपाठ संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी देखील भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सावध केले. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील तीन भूमिकेत बदल करू नये, असे हॅले यांनी सुचविले. यामध्ये इराणबाबत ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेतून माघार घेऊ नये. तसे केले आणि इराणबरोबर नव्याने अणुकरार केला तर ते विनाशकारी ठरेल, असे हॅले यांनी बजावले. त्याचबरोबर इस्रायल आणि अरब देशांमध्ये सहकार्य प्रस्थापितसाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांना बायडेन यांनी पुढे न्यावे, असे आवाहन अमेरिकेच्या माजी राजदूतांनी केले.

दरम्यान, अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबरच्या नव्या अणुकरारावर ठाम आहेत. आठवड्याभरापूर्वी बायडेन यांनी इराणला तसे स्पष्ट संकेतही दिले होते. तर बायडेन यांच्या या हालचालींमुळे सावध झालेले इस्रायल आणि सौदी अरेबिया बायडेन यांना हे इशारे देत आहेत.

leave a reply