रिझर्व्ह बँक डिसेंबरला डिजिटल करन्सी लॉन्च करण्याच्या तयारीत

- गव्हर्नर शक्तीकांत दास

मुंबई – रिझर्व्ह बँक डिसेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर डिजिटल करन्सी लॉन्च करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीच माध्यमांशी संवाद साधताना याला दुजोरा दिला असून सर्व काही ठिक राहिले तर डिसेंबरपासून डिजिटल करन्सीचा चाचणी कार्यक्रम सुरू होईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी खाजगी क्रिप्टोकरन्सीवर गव्हर्नर दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत अशा चलनाचे नियमन करता आलेले नाही. पण आरबीआयकडून आणण्यात येणारे डिजिटल चलन पुर्णपणे नियंत्रित आणि स्विकृत चलन असेल, असे शक्तीकांत दास यांनी अधोरेखित केले.

रिझर्व्ह बँक डिसेंबरला डिजिटल करन्सी लॉन्च करण्याच्या तयारीत- गव्हर्नर शक्तीकांत दासबिटकॉईन, इथिरियमसारख्या खाजगी क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार आणि आरबीआयने आपली भूमिका आधीच जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकार डिजिटल इकॉनॉमीसाठी ब्लोकचेन टेक्नॉलॉजीच्या पर्यायांचा विचार करीत असल्याचे म्हटले होते. तसेच आंतरमंत्रालयीन समितीने खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी टाकयला हवी, सरकार जारी करणाऱ्या डिजिटल करन्सीला एकमात्र मान्यता असावी अशी शिफारस केल्याचेही चौधरी म्हणाले होते. आंतरमंत्रालयीन समितीच्या शिफारसीच्या आधारावर सरकार क्रिप्टोकरन्सी विधेयक आणणार असून याद्वारे खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी टाकण्यात येणार आहे. या विधेयकाला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे, असे नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशाची अधिकृत डिजिटल करन्सी लॉन्च होईल याबाबत महत्त्वाचे विधान केले केले आहे. सेंटर बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) बाबत सावधगिरीने पावले आम्ही टाकत आहोत, कारण ही पुर्णपणे नवी संकल्पना आहे. सध्याच्या चलनाचीच ही डिजिटल आवृत्ती असेल. डिजिटल करन्सीच्या प्रत्येक बाजूचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. ही डिजिटल करन्सी पर्णपणे सुरक्षित असावी, अर्थव्यवस्थेवर त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, अशा विविध मुद्यांचा विचार करून या डिजिटल करन्सीची रुपरेषा ठरविली जात असल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.

मात्र सीबीडीसी कधी लॉन्च करण्यात येईल हे निश्‍चित सांगता येणार नाही. मात्र सर्वकाही ठिक राहिले, तर डिसेंबरपासून सीबीडीसीच्या चाचणी कार्यक्रमाला सुरूवात होईल, असे दास म्हणाले. युरोपीय देश, ब्रिटन, चीन अशाच प्रकारच्या डिजिटल चलनावर काम करीत आहे. ज्याचा वापर व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या वापरासाठी होईल, याकडेही दास यांनी लक्ष वेधले.

गेल्याच महिन्यात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी.आर.शंकर यांनीही यावर्षाच्या अखेरीपर्यंत आरबीआय कायदेशीर डिजिटल चलनाचे ऑपरेशन मॉडेल आणू शकतो, असे संकेत दिले होते. टप्प्याटप्प्याने डिजिटल करन्सी लॉन्च करण्याबाबत विचार सुरू असल्याचे शंकर म्हणाले होते. त्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही वर्षाअखेरीपासून अधिकृत डिजिटल करन्सी समोर येईल व तिच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली आहे.

leave a reply