इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ले

बगदाद – इराकची राजधानी बगदादच्या उत्तरेकडे असलेल्या बलाद येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर रविवारी रॉकेट हल्ले झाले. या रॉकेट हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. पण अमेरिका आणि इराकी लष्करातील महत्त्वापूर्ण चर्चेच्या तीन दिवस आधी हा हल्ला झाल्याचे आखाती माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

येत्या बुधवारी अमेरिका आणि इराकच्या लष्करामध्ये धोरणात्मक चर्चा होणार आहे. इराकमध्ये तैनात अमेरिकी लष्कराच्या माघारीवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. अमेरिकी लष्कराने इराकमधून पूर्ण माघार घ्यावी, अशी मागणी इराकमधील इराणसंलग्न नेते व सशस्त्र गट करीत आहेत. त्यामुळे इराकच्या सरकारवर दबाव टाकण्यासाठी व अमेरिकेला इशारा देण्यासाठी इराणसंलग्न गटांनी हे रॉकेट हल्ले चढविल्याचा दावा केला जातो.

बलाद लष्करी तळावर अमेरिकेचे जवान तैनात आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इराकमधील अमेरिकेच्या लष्करी व हवाई तळांवर रॉकेट हल्ले झाले आहेत. पण या तळांवर अमेरिकेच्या लष्कराचे कंत्राटदार व नाटोचे जवान तैनात होते. पण गेल्या काही महिन्यांमध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचे जवान तैनात असलेल्या लष्करी तळावर रॉकेट्स डागल्याचे आखाती माध्यमे निदर्शनास आणून देत आहेत.

दरम्यान, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘ड्विट आयसेनहॉवर’ आपल्या विनाशिकांच्या ताफ्यासह भूमध्य समुद्रातून रेड सीमध्ये दाखल झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या युद्धनौकेने सुएझचा कालवा ओलांडल्याच्या बातम्या व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. आयसेनहॉवर युद्धनौका पर्शियन आखातातील अमेरिकेच्या नौदलाची कमांड हाती घेणार आहे.

leave a reply