रशिया आणि इराण स्टेबलकॉईन क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणार

रशियन माध्यमांचा दावा

मॉस्को – रशिया आणि इराणने परस्परांबरोबरील व्यापारासाठी सोन्याचे पाठबळ असलेली क्रिप्टोकरन्सी ‘स्टेबलकॉईन’ सुरू करण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या आहेत. यासंदर्भात रशियाने आवश्यक ती पावले उचलल्याचे दावे केले जातात. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर, अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादून रशियाला डॉलरचा वापर करता येणार नाही, अशी तरतूद केली होती. त्यानंतर रशिया आपल्या रूबल चलनाचा वापर करून तसेच इतर देशांचे चलन स्वीकारून, आपल्यावरील या निर्बंधांना प्रत्युत्तर दिले होते. पण इराणबरोबरील व्यापारात ‘स्टेबलकॉईन’चा वापर करून रशिया व इराण आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकेच्या डॉलरलाच हादरा देण्याची जबरदस्त तयारी करीत असल्याचे समोर येत आहे.

Russia-and-Iran stablecoin-backed-by-goldद्विपक्षीय व्यापारासाठी रशिया व इराण रुबल व रियाल या आपल्या चलनांमध्ये व्यवहार करू शकले असते. पण स्टेबलकॉईन या नव्या क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्याची तयारी करून या दोन्ही देशांनी निराळ्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. जगभरातील प्रमुख देश डिजिटल चलनांकडे वळत असून क्रिप्टोकरन्सीच्या मागे असलेल्या ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जगभरात प्र्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करीत असलेल्या रशिया व इराणने ‘स्टेबलकॉईन’च्या पर्यायावर काम सुरू केले आहे. सोन्याचे पाठबळ असलेली ही जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी ठरेल, त्यामुळे याची विश्वासार्हता अधिक असू शकेल. पुढच्या काळात अमेरिकेच्या निर्बंधांचे बळी ठरलेले देश रशिया व इराणला साथ देऊन स्टेबलकॉईनचा वापर सुरू करू शकतात. यामुळे स्टेबलकॉईनचा वापर केवळ या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही. या क्रिप्टोकरन्सीला प्रारंभिक यश मिळाले, तर त्याचे फार मोठे दूरगामी परिणाम संभवतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर स्टेबलकॉईनचे दर निर्धारित करील, अशी प्राथमिक माहिती रशियन माध्यमांकडून दिली जात आहे. मात्र स्टेबलकॉईनबाबतचे अधिक तपशील अजूनही पूर्णपणे समोर आलेले नाही. रशिया व इराण अधिकृत पातळीवर याबाबत अधिक माहिती देण्यास सध्या तरी तयार नसल्याचे दिसत आहे.

रशिया व इराण इंधनसंपन्न देश असून सध्याच्या काळात इंधनाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेले असताना, रशियाला इंधन निर्यातीतून लाभ मिळू नये, यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर वेगवेगळे निर्बंध लादले होते. तरीही रशियाची इंधन निर्यात रोखण्यात या देशांना यश मिळालेले नाही. आपल्या प्रभावाचा वापर करून रशिया भारत तसेच चीनला प्रचंड प्रमाणात इंधनाची निर्यात करीत आहे. पण इराण मात्र अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांच्या कचाट्यातून सुटलेला नाही. पुढच्या काळात इराण देखील सवलतीच्या दरात इंधन पुरवून भारत तसेच इतर देशांना इंधनाचा पुरवठा करण्याच्या तयारीत आहे.

अशा परिस्थितीत डॉलरचा वापर टाळून स्टेबलकॉईनद्वारे इराण इंधनव्यवहारासाठी अधिक पुढाकार घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्टेबलकॉईनचा वापर ही केवळ आर्थिक नाही तर रशिया व इरणची फार मोठी धोरणात्मक खेळी असल्याचे समोर येत आहे.

leave a reply