रशिया अणुयुद्धात जिंकू शकत नाही

नाटोच्या प्रमुखांचा इशारा

nuclear warमॉस्को/किव्ह – रशियाकडून अण्वस्त्रांबाबत करण्यात आलेले वक्तव्य अत्यंत धोकादायक व बेजबाबदार असून रशिया अणुयुद्ध कधीच जिंकू शकणार नाही, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. त्याचवेळी रशियाने केलेली अतिरिक्त सैन्यतैनातीची घोषणा ही युक्रेन सीमेवर कोणतीही चूक होऊ नये यासाठी घेतलेली खबरदारी असावी, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, रशियाने अण्वस्त्रांचा वापर केलाच तर अमेरिका रशियाविरोधात जबरदस्त हल्ले चढवेल, असे माजी लष्करी अधिकारी बेन हॉजेस यांनी बजावले.

nuclear-war‘पाश्चिमात्य देश रशियाला न्यूक्लिअर ब्लॅकमेलची धमकी देत आहेत. पण हा डाव त्यांच्यावरच उलटू शकतो, हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे. जर रशियाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान मिळाले तर देश व जनतेच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात येईल. मी हवेत बोलत नाही, याची जाण पाश्चिमात्यांनी ठेवावी’, अशा शब्दात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चिमात्यांना अणुयुद्धाबाबत इशारा दिला होता. यावेळी रशियाकडे नाटो देशांपेक्षा अधिक प्रगत अण्वस्त्रे असल्याचेही पुतिन यांनी सांगितले होते. पुतिन यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय समुदायातून प्रतिक्रिया उमटत असून अमेरिका व ब्रिटनने रशियाची धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, असे बजावले आहे. नाटो प्रमुखांनीही याचा पुनरुच्चार करतानाच रशिया अणुयुद्धात जिंकू शकणार नाही, असा दावा केला. अणुयुद्ध कधीच लढले जाऊ शकत नाही व त्यात कोणीही जिंकू शकत नाही, याची रशियन राष्ट्राध्यक्षांना कल्पना आहे, असेही नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले. त्याचवेळी रशियाच्या आण्विक हालचालींमध्ये फारसा बदल झाल्याचे नाटोला दिसलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

leave a reply