इराणने इस्रायलच्या नागरी यंत्रणांवर सायबर हल्ले चढविले

इस्रायली अधिकाऱ्यांचा आरोप

flagजेरूसलेम – गेल्या काही वर्षात इराणने चढविलेले कित्येक सायबर हल्ले इस्रायली यंत्रणांनी हाणून पाडले. इराण इस्रायलच्या नागरी यंत्रणांना सायबर हल्ल्यांद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण इस्रायली यंत्रणांनी या आघाडीवर प्राप्त केलेली क्षमता शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहे, असा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला. नाव उघड न करण्याच्या अटीवर माध्यमांना या अधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती, इराण व इस्रायलमध्ये सुरू असलेल्या सायबर युद्धावर प्रकाश टाकत आहे.

२०२० साली इराणने इस्रायलमधील पाणीपुरवठ्याशी निगडीत असलेल्या यंत्रणेवर सायबर हल्ले चढविले होते. त्याच्या आधीही इराणच्या सायबर हल्लेखोरांनी इस्रायली जनतेला भयभीत करण्यासाठी नागरी यंत्रणांवर सायबर हल्ल्यांचा प्रयत्न करून पाहिला होता. इस्रायलचे जनजीवन विस्कळीत करून भयाचे वातावरण पसरविणे हा त्यामागचा हेतू असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात इराणकडून होणाऱ्या या सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात 70 टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद देखील या अधिकाऱ्यांनी केली. इराणने तब्बल २० सायबर युनिटस्‌‍ तयार केलेल्या आहेत व यातील किमान दहा १० युनिटस्‌‍ इस्रायलाच लक्ष्य करण्याच्या कामात व्यस्त आहेत, असा निष्कर्ष इस्रायली डिफेन्स फोर्सेसच्या (आयडीएफ) ‘सी4आय कॉर्प्स’ने नोंदविला आहे.

iran-1मात्र आयडीएफ गुप्तचर संघटना शिन बेत व मोसाद यांनी संयुक्तपणे सायबर हल्ल्यांविरोधात आपली क्षमता प्रचंड प्रमाणात वाढविलेली आहे. यामुळे इराणकडून होत असलेल्या या हल्ल्यांना यश मिळू शकले नाही, असा दावा सदर अधिकाऱ्यांनी केला. या अधिकाऱ्यांचे नाव समोर आलेले नसले, तरी त्यांनी सदर माहिती उघड करण्याची निवडलेली वेळ अतिशय महत्त्वाची ठरते. इराणच्या अणुकार्यक्रमावर पाश्चिमात्य देशांमध्ये चर्चा सुरू आहे. यासाठी इराणला प्रस्ताव दिले जात असून इराणनेही आपल्या मागण्या स्पष्टपणे पाश्चिमात्यांसमोर ठेवलेल्या आहेत. मात्र काहीही झाले तरी इराणवर विश्वास ठेवता येणार नाही, अण्वस्त्रसज्ज इराण इस्रायलच्या अस्तित्त्वासाठी धोकादायकच ठरेल, असे इस्रायलचे म्हणणे आहे.

इराण व इस्रायल परस्परांवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीचा नाझी हुकूमशहा हिटलर याने खरोखरच ज्यूधर्मियांचा वंशसंहार घडविला होता का? असा प्रश्न करून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी होलोकॉस्टवर शंका घेतली होती. त्याचा दाखला देऊन होलोकॉस्ट नाकारण्याच्या मानसिकतेमुळेच इराणला अण्वस्त्रज्ज होऊ देता येणार नाही, असे इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी म्हटले होते. अशा परिस्थितीत इराण इस्रायलच्या नागरी यंत्रणांवर सायबर हल्ले चढवित असल्याचे दावे प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सायबर युद्धाची माहिती अधिक ठळकपणे जगासमोर येत आहे. पुढच्या काळात यासंदर्भातील आरोप अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply