युक्रेनवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाकडून अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याची हकालपट्टी

मॉस्को – युक्रेनच्या मुद्यावरून, रशिया व अमेरिकेदरम्यान निर्माण झालेल्या तणावात नवी भर पडली आहे. रशियाने अमेरिकन दूतावासातील वरिष्ठ अधिकारी बार्ट गॉर्मन यांची हकालपट्टी केली आहे. अमेरिकेने रशियन दूतावासावर केलेल्या कारवाईच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रशियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी दिली. अमेरिकी अधिकार्‍यांची हकालपट्टी करतानाच रशियाने युक्रेन मुद्यावरून अमेरिकेकडून सुरू असलेल्या अपप्रचाराचाही समाचार घेतला आहे. अमेरिका व इतर देशांमधील अधिकारी केवळ त्यांच्या समाधानासाठी रशियावर दोषारोप करण्यात धन्यता मानत आहेत, असा टोला परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी लगावला.

युक्रेन सीमेवरील तैनातीपूर्वी सायबरहल्ले व हेरगिरीच्या मुद्यावरून अमेरिका आणि रशियात राजनैतिक तणाव निर्माण झाला होता. या राजनैतिक तणावादरम्यान अमेरिकेने रशियन दूतावासातील जवळपास ५५ अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हकालपट्टीचे आदेश दिले होते. या आदेशांवर रशियाने नाराजी व्यक्त केली होती. युक्रेन मुद्यावरून तणाव अधिकच चिघळल्याने दोन्ही देशांनी माघार घेण्यास नकार दिला असून राजनैतिक पातळीवरील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. रशियाने अमेरिकेचे ‘डेप्युटी चीफ ऑफ मिशन’ असणार्‍या बार्ट गॉर्मन यांनी केलेली हकालपट्टी त्याचाच भाग आहे.

दरम्यान, रशिया युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचे दावे सातत्याने पुढे रेटणार्‍या अमेरिका व इतर देशांच्या अधिकार्‍यांवर रशियाने टीकास्त्र सोडले आहे. ‘अमेरिका व इतर देशांकडून युक्रेन आक्रमणाबाबत करण्यात येणारी वक्तव्ये हा अपप्रचार, फेक न्यूज तसेच काल्पनिक कथांचा भाग असल्याचे परराष्ट्र धोरणाचे निरीक्षकही आता सांगू लागले आहेत. काही अधिकारी केवळ त्यांना बोलायला आवडते म्हणून वक्तव्ये करत आहेत. जर पाश्‍चात्य अधिकार्‍यांना अशा वक्तव्यांमधून आनंद मिळत असेल तर त्यांनी त्यांच्या समाधानासाठी वक्तव्ये करीत रहावे’, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी टोला लगावला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी रशियाच्या युक्रेनमधील आक्रमणाबाबत वेगवेगळ्या तारखा व वेळा सांगून ही माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याचे सांगत आहेत. लोकशाहीवादी व खुल्या जगाचे नेतृत्त्व करणार्‍या कोणत्या देशातील यंत्रणा अशी वेगवेगळी माहिती पुरवित राहते’, असा सवाल करून परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, शनिवारी रशियाच्या संरक्षणदलांनी ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’चे आयोजन केले असून त्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित राहणार आहेत. रशियाच्या नॉर्दर्न व सदर्न मिलिटरी डिस्ट्रिक्टसह नौदलाचे ‘ब्लॅक सी फ्लीट’ या व्यापक सरावात सहभागी होणार आहे. या सरावात आंतरखंडीय तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश असेल, असे सांगण्यात येते.

बेलारुस अण्वस्त्रे तैनात करु शकतो – राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को

मिन्स्क – पाश्‍चात्य देशांच्या कारवाईमुळे बेलारुसला धोका निर्माण झाल्यास देशाच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रे तैनात करण्यात येतील, असे बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी म्हटले आहे. सध्या रशिया व बेलारुसमध्ये सुरू असलेल्या लष्करी सरावाच्या पार्श्‍वभूमीवर लुकाशेन्को यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी बेलारुसमध्ये रशियाने इस्कंदर क्षेपणास्त्रे तैनात करून प्रशिक्षण तळ उभारावा, अशीही मागणी केली.

या महिन्यात बेलारुसमध्ये रशियन अण्वस्त्रांच्या तैनातीवर सार्वमत आयोजित करण्यात आले आहे. सार्वमताच्या निकालानंतर बेलारुसच्या राज्यघटनेत बदल करून रशियन अण्वस्त्रे तैनात केली जातील, असे संकेत बेलारुसच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. अण्वस्त्रांबरोबरचे रशियाने ‘एस-४००’ ही अत्याधुनिक हवाईसुरक्षायंत्रणा तैनात करावी, असा प्रस्तावही बेलारुसने दिल्याचे सांगण्यात येते.

leave a reply