हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलने लढाऊ विमाने रवाना केली

जेरूसलेम/बैरूत – शुक्रवारी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर ड्रोन हल्ला चढविला. इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी सीमाभागातच हा हल्ला उधळल्यामुळे मोठी हानी टळली. यानंतर इस्रायलने लढाऊ विमाने रवाना करून हिजबुल्लाहला इशारा दिला. येत्या काळात इस्रायलवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे अचूक हल्ले चढविणार असल्याची धमकी हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने दोन दिवसांपूर्वीच दिली होती.

लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये बंकरमध्ये लपून बसलेल्या हसन नसरल्लाने बुधवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केली. यामध्ये हिजबुल्लाहच्या प्रमुखाने इस्रायलवर हल्ले चढविण्याचे धमकावले होते. इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूकपणे हल्ले चढविणारे रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स आपल्याकडे असल्याचा दावा नसरल्लाने केला होता. हिजबुल्लाहच्या ताफ्यात असलेली हजारो रॉकेट्स क्षेपणास्त्रांमध्ये रुपांतरीत करण्याचे तंत्रज्ञान आपल्याकडे असल्याचे नसरल्लाने जाहीर केले होते.

हे सारे इराणच्या सहाय्यामुळे शक्य झाल्याचे सांगून हिजबुल्लाहच्या प्रमुखाने लवकरच आपण इराणचा दौरा करणार असल्याचे म्हटले होते. तसेच लवकरच इस्रायलवर हिजबुल्लाहचे ड्रोन्स, क्षेपणास्त्रे धडकतील, असा इशारा नसरल्लाने दिला होता. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी हिजबुल्लाह प्रमुखाची ही धमकी गांभीर्याने घेऊन सुरक्षा यंत्रणांना सावध राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेत हिजबुल्लाहने ड्रोन प्रक्षेपित केला.

इस्रायलने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून हिजबुल्लाहचे ड्रोन पाडले. तसेच लेबेनॉनच्या हवाई सीमेवर नजर ठेवण्यासाठी आपली लढाऊ विमाने रवाना केली. हिजबुल्लाहने इस्रायलवरील ड्रोन हल्ल्याची कबुली दिली. आपण धाडलेले ड्रोन ४० मिनिटे इस्रायलच्या हद्दीत टेहळणी करून परतल्याचा दावाही हिजबुल्लाहने केला. त्यामुळे लेबेनॉनमधील या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने आपले ड्रोन पाडल्याचा दावा फेटाळला.

दरम्यान, या घटनेनंतर इस्रायल तसेच आखाती विश्‍लेषक येमेनमधील हौथी बंडखोर आणि लेबेनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी यांच्या मोडस ऑपरेंडीकडे लक्ष वेधत आहेत. इराणसंलग्न असलेल्या या दोन्ही दहशतवादी संघटना इराणविरोधी देशांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवून संबंधित देशांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा या विश्‍लेषकांनी केला.

leave a reply