रशियाकडून ‘इस्कंदर’ क्षेपणास्त्र यंत्रणा बेलारुसला सुपूर्द

बेलारुसच्या पश्चिम सीमेवर अण्वस्त्रे तैनात करण्याचे संकेत

Iskandarमॉस्को/मिन्स्क – रशियाने आण्विक क्षमता असलेली इस्कंदर क्षेपणास्त्र यंत्रणा बेलारुसकडे सुपूर्द केली आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी ही माहिती दिली. गेल्याच महिन्यात रशिया आपले ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ बेलारुसमध्ये तैनात करील, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर इस्कंदर बेलारुसकडे सुपूर्द करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. दरम्यान, बेलारुसमधील रशियन राजदूतांनी ‘टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स’ बेलारुसच्या पश्चिम सीमेवर तैनात करण्यात येतील, असे संकेत दिले. बेलारुसची पश्चिम सीमा लाटविया, लिथुआनिया व पोलंड या देशांना जोडलेली आहे.

belarus-analysis-blog_mapरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बेलारुसबरोबरील संरक्षणसहकार्य वाढविण्यावर भर दिला होता. युक्रेनबरोबरील संघर्ष सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेलारुसचा दौरा केला होता. दोन देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत करारही झाले होते. त्यात रशियन संरक्षणदलांसह क्षेपणास्त्रे तसेच हवाईसुरक्षायंत्रणेच्या तैनातीचीही तरतूद होती.

दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार, रशियाने जवळपास १० हजार जवान बेलारुसमध्ये तैनात केले आहेत. त्याचवेळी ‘एस-४०० डिफेन्स सिस्टिम’ही बेलारुसमध्ये धाडण्यात आली होती. त्यानंतर आता आण्विक क्षमता असलेली इस्कंदर क्षेपणास्त्र यंत्रणा बेलारुसच्या संरक्षणदलांना सुपूर्द करून रशियाने आपले सहकार्य अधिकच भक्कम झाल्याचे संकेत दिले आहेत.

बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काही महिन्यांपूर्वी रशियाकडे अण्वस्त्रांची मागणी केली होती. बेलारुसच्या या मागणीनुसार, रशिया अण्वस्त्रेही तैनात करणार आहे. जुलै महिन्यापर्यंत बेलारुसमध्ये अण्वस्त्रांच्या ‘स्टोरेज’साठी उभारण्यात येणाऱ्या तळाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर रशियन अण्वस्त्रे बेलारुसमध्ये तैनात करण्यात येतील, असे सांगण्यात येते.

हिंदी

leave a reply