रशिया तालिबानकडून अमेरिकन शस्त्रास्त्रे मिळविण्याच्या प्रयत्नात

रशियन सोशल मीडियावरील दावा

काबुल – अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याची तयारी रशियाने केली आहे. पण याच्या मोबदल्यात अमेरिकन लष्कर माघार घेताना अफगाणिस्तानात सोडून दिलेली शस्त्रास्त्रे तालिबानने आपल्या हवाली करावी, अशी रशियाची अट आहे. तालिबान लवकरच यावर निर्णय घेईल, असा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन याप्रकरणी विशेष स्वारस्य दाखवित असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

afghan taliban weapons2021 सालच्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्यमाघार घेतली. पण ही माघार घेत असताना अमेरिकेने मोठा शस्त्रसाठा रिकाम्या झालेल्या लष्करी तळांवर तसाच सोडून दिला होता. सुरुवातीला बायडेन प्रशासनाने या आरोपांवर बोलण्याचे टाळले होते. पण अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने सिनेटसमोर दिलेल्या माहितीनुसार, किमान 7.12 अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य अफगाणिस्तानात राहिली होती.

यामध्ये 33 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स, 23 सुपर टूकानो लढाऊ विमाने, चार सी-130 मालवाहू विमाने, 22 हजारांहून अधिक हम्वी, 115 लष्करी वाहने, 634 चिलखती वाहने, साडेपाच लाख मशिनगन्स, 16 हजार नाईट व्हिजन गॉगल्स, दीड लाखांहून अधिक रेडिओ अशी शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती पडल्याचे व्हिडिओज्‌‍, फोटोग्राफ्स समोर आले होते. त्यामुळे अमेरिकेने सैन्यमाघार घेताना तालिबानच्या हाती अफगाणिस्तानबरोबरच प्रगत शस्त्रास्त्रे देखील सोपविल्याची टीका झाली होती. अमेरिकेने तालिबानला शस्त्रसज्ज केल्याचा ठपका बायडेन प्रशासनावर ठेवण्यात आला होता.

दरम्यान, अफगाणिस्तानातील आपल्या राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी, अशी मागणी तालिबान करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानची वकिली करणाऱ्या पाकिस्तान किंवा तालिबानच्या राजवटीबरोबर इंधन तसेच इतर सहकार्य करार करणाऱ्या चीनने देखील तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. तर अमेरिका व मित्रदेश मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित करून तालिबानवर नवे निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत, रशियाने तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याची तयारी दाखविली आहे.

पण याच्या मोबदल्यात अमेरिकेने माघारी सोडलेली शस्त्रास्त्रे आपल्या हवाली करावी, अशी मागणी रशियाने तालिबानकडे केली आहे. रशियातील आघाडीच्या सोशल मीडियामध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. तर तालिबानचे नेते देखील रशियाच्या या प्रस्तावामुळे चकित झाल्याचे यात म्हटले आहे. तसेच रशियाच्या प्रस्तावावर तालिबान विचार करीत असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

युक्रेनच्या युद्धात अमेरिका व युरोपिय देश युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवित आहेत. तर दुसऱ्या बाजूला रशियाकडे असलेला शस्त्रसाठा संपुष्टात येत असल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. अशा परिस्थितीत तालिबानमार्फत अमेरिकेची शस्त्रास्त्रे रशियाच्या हाती पडली, तर त्याचा युक्रेनच्या विरोधात वापर होण्याची दाट शक्यता आहे. या शस्त्रांच्या थेट प्रभावापेक्षाही, अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेताना दाखवलेल्या बेजबाबदारपणाचा मुद्दा यामुळे ऐरणीवर येऊ शकतो. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासमोरील अडचणी यामुळे वाढू शकतात.

leave a reply