रशिया युक्रेनवर आक्रमण करु शकतो

- युरोपला अमेरिकेचा इशारा

युक्रेनवर आक्रमणवॉशिंग्टन/मॉस्को – ‘रशियाचे इरादे नक्की काय आहेत, त्याबद्दल सांगता येणार नाही पण रशियाच्या डावपेचांबद्दल आम्हाला कल्पना आहे. २०१४ साली रशियाने ज्याप्रमाणे हल्ला चढविला होता त्याची पुनरावृत्ती करण्याची चूक रशिया करु शकतो आणि ही अत्यंत चिंतेची बाब ठरते’, या शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी युरोपिय देशांना रशियाच्या युक्रेनवरील संभाव्य आक्रमणाबाबत इशारा दिला. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनीही यासंदर्भातील माहिती युरोपिय यंत्रणांना दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. आमच्याकडून कोणालाही धोका नाही, असा खुलासा रशियन सरकारकडून करण्यात आला आहे.

युक्रेनवरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी व तणाव निर्माण करण्यासाठी रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ ९० हजार जवान तैनात केल्याचा आरोप युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात केला होता. फक्त भूसीमाच नाही तर ब्लॅक सी सागरी क्षेत्रातही रशियन युद्धनौकांच्या हालचाली वाढल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. ही सर्व तयारी म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील नव्या हल्ल्याचे संकेत असल्याचे युक्रेन सरकार तसेच पाश्‍चात्य विश्‍लेषकांकडून सांगण्यात येत होते. अमेरिकेने दिलेला इशारा याला दुजोरा देणारा ठरतो.

युक्रेनवर आक्रमणअमेरिकेकडून हा इशारा देण्यात येत असतानाच युक्रेननजिकच्या क्षेत्रात हालचालींना वेग आल्याचे समोर येत आहे. बुधवारी नाटोची चार लढाऊ तसेच टेहळणी विमाने ‘ब्लॅक सी’च्या हद्दीत आढळल्याची माहिती रशियाने दिली आहे. या विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी रशियाकडून लढाऊ विमाने धाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेच्या दोन युद्धनौका सध्या ब्लॅक सीमध्ये असून रशियानेही युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यापाठोपाठ रशियाने आपली दोन बॉम्बर्स बेलारुसमध्ये रवाना केल्याचेही समोर आले आहे. गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यात फोनवर चर्चा झाली असून पुतिन यांनी पाश्‍चात्य फौजांच्या हालचाली चिथावणी देणार्‍या असल्याचा आरोप केला आहे.

युक्रेनवर आक्रमणअमेरिकेने रशियाच्या आक्रमणाबाबत दिलेल्या इशार्‍यावर रशियन सरकारकडून खुलासा देण्यात आला. ‘रशियन लष्कराच्या रशियाच्या हद्दीतील हालचालींवर इतरांनी चिंता करण्याचे कारण नाही. ही बाब रशियाने यापूर्वीही वारंवार सांगितली आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले इशारे उगाचच तणाव वाढविणारे आहेत. रशियाच्या हालचालींचा कोणालाही धोका नाही’, असे स्पष्टीकरण रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिले.

यापूर्वी २०१४ साली रशियान युक्रेनवर हल्ला चढवून क्रिमिआ या प्रांतावर ताबा मिळविला होता. त्यानंतर पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क या दोन प्रांतांच्या काही भागावरही रशियाचे समर्थन असलेल्या सशस्त्र गटांनी ताबा मिळविला आहे. या मुद्यावरून पाश्‍चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. क्रिमिआच्या मुद्यावर माघार घेण्यास रशियाने सपशेल नकार दिला असून त्यावर चर्चा करण्यात येणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून देण्यात आलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

leave a reply