मॉस्को/वॉशिंग्टन/बीजिंग – ‘अमेरिका व नाटोची धोरणे रशियाला चीनच्या दिशेने ढकलत चाललेली नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच चीनशी अधिक जवळीक साधण्याचा मार्ग निवडला आहे. ही जवळीक रशियाची घोडचूक ठरु शकते’, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला. गेल्या काही वर्षात रशिया व चीन अधिकाधिक जवळ येत असून या देशांनी अमेरिका व पाश्चात्य देशांच्या विरोधात मोठी आघाडी उघडल्याचे संकेत मिळत आहेत.
मार्च महिन्यात, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी चीनचा दौरा केला होता. या दौर्यात, त्यांनी आधुनिक व्यवस्था कायम राखण्यासाठी रशिया व चीन एकजूट अत्यावश्यक ठरते, असे बजावले होते. त्यानंतर जून महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ पार पडली होती. या बैठकीत रशिया व चीनमधील ‘फ्रेंडशिप ट्रिटी’च्या विस्ताराची घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ दोन्ही देशांनी अंतराळात संयुक्तरित्या ‘मून बेस’ उभारण्याचेही जाहीर केले होते. ऑगस्ट महिन्यात दोन देशांमध्ये झालेल्या व्यापक युद्धसरावादरम्यान, रशिया व चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्करी सहकार्य वाढविण्याची माहिती दिली होती.
दोन देशांमधील हे व्यापक सहकार्य अमेरिका व युरोपसह मित्रदेशांसाठी मोठे आव्हान ठरते, असा सूर अधिकारी विश्लेषकांकडून उमटत आहे. या पार्श्वभूमीवर बोल्टन यांनी उघडपणे रशियाला चीनबरोबरील जवळिकीबाबत इशारा देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘रशियाच्या सुरक्षेच्या मुद्याचा विचार केला तर ती पूर्वेऐवजी पश्चिमी देशांशी अधिक जोडलेली आहे. रशियन संघराज्य कोसळल्यानंतर रशियाला पाश्चात्यांबरोबरील जवळचे संबंध निर्माण करण्याची मोठी संधी होती. त्या संधीचा फायदा रशियाने घेतला नाही व आता वेळ निघून चालल्याचे दिसत आहे’, असे बोल्टन यांनी बजावले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चीनशी अधिक जवळीक साधण्याचे ठरविले असून, कोणीही रशियाला त्या दिशेने ढकलले नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ‘चीनशी साधलेली ही जवळीक रशियाची घोडचूक ठरते. रशियाकडे चीनला विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन तसेच शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. पण हे सगळे चीनला देण्याचा रशियाचा निर्णय अत्यंत वाईट निर्णय ठरु शकतो. भविष्यात शतकातील उर्वरित सर्व काळ चीनबरोबर घालविण्याचा निर्णय रशियाच्या फारशा हिताचा ठरणार नाही’, असा दावा अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांनी केला.
पाश्चात्यांऐवजी चीनची निवड केल्याने रशियाच्या पूर्व भागात असलेल्या प्रदेशाला धोका उत्पन्न होऊ शकतो, याकडे बोल्टन यांनी लक्ष वेधले. ‘उरल पर्वताच्या पूर्वेकडे असलेल्या रशियन क्षेत्रात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, पण लोकसंख्या जास्त नाही. त्याचवेळी चीन हा प्रचंड लोकसंख्या व मर्यादित नैसर्गिक स्रोत असणारा देश आहे. अशा वेळी रशिया भविष्यात आपल्या पूर्व भागावरील नियंत्रण कदाचित गमावू शकतो’, असा इशारा बोल्टन यांनी यावेळी दिला. रशियाचे धोरण ठरविणार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चीनबरोबर जवळीक साधण्याचा निर्णय घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
बोल्टन यांनी यापूर्वीही चीनबाबत गंभीर इशारे दिले असून हा देश पाश्चात्य जगाच्या अस्तित्त्वासाठी धोका ठरु शकतो, असे बजावले होते.