रशियाने तुर्कीला ‘बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो’ची आठवण करून दिली

मॉस्को/इस्तंबूल – भूमध्य सागरी क्षेत्रातील अधिकारांवरून तुर्की व ग्रीसमध्ये पेटलेल्या वादात रशियानेही उडी घेतली आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन ग्रीसला सातत्याने धमकावत असतानाच, रशियाने तुर्कीला ‘बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो’ची आठवण करून दिली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून, हे युद्ध ग्रीसच्या स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरले होते, असे म्हटले आहे. या पोस्टपूर्वी रशियाच्या ग्रीसमधील दूतावासाने, भूमध्य सागरी क्षेत्रात संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘लॉ ऑफ ड सी’चे पालन होणे महत्त्वाचे आहे, अशी उघड भूमिका मांडली होती. तुर्कीने त्याच्या अंमलबजावणी ला केलेला विरोध लक्षात घेता, रशियन दूतावासाने केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

रशियाने तुर्कीला 'बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो'ची आठवण करून दिली‘१९३ वर्षांपूर्वी रशिया, ग्रेट ब्रिटन व फ्रान्सच्या संयुक्त दलाने नॅव्हॅरिनोच्या उपसागरात तुर्की व इजिप्तच्या आरमाराचा दारुण पराभव केला होता. मित्रदेशांच्या आरमाराला मिळालेला हा विजय, ग्रीसच्या स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरलेल्या गोष्टींमधील एक महत्त्वाचा घटक ठरला होता’, असे ट्विट रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाचे हे ट्विट लक्ष वेधून घेणारे ठरले असून, ग्रीसविरोधातील संघर्षाच्या मुद्यावरून रशियाने तुर्कीला सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

रशियाने तुर्कीला 'बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो'ची आठवण करून दिली२० ऑक्टोबर, १८२७ रोजी झालेल्या ‘बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो’मध्ये रशिया, ब्रिटन व फ्रान्सने ऑटोमन साम्राज्य व इजिप्तच्या आरमाराचा दारुण पराभव केला होता. ‘आयओनियन सी’चा भाग असणाऱ्या या क्षेत्रात झालेल्या या युद्धात रशियासह मित्रदेशांच्या आरमाराने तुर्की व इजिप्तची ६० जहाजे बुडवली होती. यात तीन हजारांहून अधिक खलाशी व जवान मारले गेले होते. ‘सेलिंग शिप्स’च्या इतिहासातील ही शेवटची मोठी सागरी लढाई मानली जाते. या युद्धानंतर तत्कालिन तुर्कीच्या ऑटोमन साम्राज्याची ग्रीसवरील पकड ढिली पडण्यास सुरुवात झाली होती. ‘बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो’नंतर १८२८-२९ साली झालेले ‘रुसो-तुर्कीश वॉर’ व फ्रान्सने केलेला हल्ला, यामुळे ऑटोमन साम्राज्याला ग्रीसच्या स्वातंत्र्य देणे भाग पडले होते.

रशियाने तुर्कीला 'बॅटल ऑफ नॅव्हॅरिनो'ची आठवण करून दिलीगेल्या काही वर्षांत रशियाचे तुर्कीबरोबरील संबंध संमिश्र स्वरूपाचे राहिले आहेत. रशियाकडून शस्त्रास्त्रे व इंधन खरेदी करणारा तुर्की, सिरिया तसेच लिबियात रशियन हितसंबंधांविरोधात खडा ठाकला आहे. तरीही सध्या रशियाने इतर मुद्यांवर तुर्कीशी असलेले सहकार्य रोखलेले नाही. मात्र आर्मेनिया-अझरबैजान युद्धातील तुर्कीची भूमिका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सहनशीलतेची कसोटी घेणारी ठरली आहे. ते उघडपणे तुर्की व त्याच्या हितसंबंधांविरोधात संघर्षाचा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा रशियन विश्लेषक देत आहेत. याच पार्श्वभूमीवर तुर्कीने काही दिवसांपूर्वी, पुतिन यांच्यासाठी संवेदनशील मुद्दा मानल्या जाणाऱ्या युक्रेन व क्रिमियाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचेही समोर आले होते. ही बाब रशिया व तुर्कीमधील उघड संघर्षाचे कारण ठरू शकते, असे मानले जाते.

अशा वेळी, रशियाच्या परराष्ट्र विभागाकडून तब्बल दोन शतकांपूर्वीच्या युद्धाची आठवण तुर्कीला करून देणे लक्ष वेधून घेणारे ठरते. तुर्कीने ग्रीसविरोधात घेतलेल्या भूमिकेवर अमेरिका व युरोपिय देशांनी आधीच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युरोपिय देशांनी तर उघडपणे ग्रीसच्या बाजूने उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. आता रशियानेही यात उडी घेत आपले समर्थन ग्रीसला असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे भूमध्य सागराच्या मुद्यावर तुर्की चांगलाच कोंडीत सापडण्याची शक्यता दिसत आहे.

leave a reply