रशियाने ब्रिटन, फ्रान्स व पोलंडवर हल्ले चढवावे

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या समर्थकांचे आवाहन

पोलंडवर हल्लेमॉस्को – ब्रिटनने युक्रेनसाठी आपले ‘चॅलेंजर 2’ रणगाडे रवाना केले आहेत. फ्रान्सने आपले ‘एएमएक्स-10’ रणगाडे युक्रेन देण्याची तयारी केली असून जर्मनी युक्रेनी लष्करासाठी 40 मार्डर रणगाडे पाठविण्याची तयारी करीत आहे. तर अमेरिका आपले युक्रेनला सुमारे 50 ‘एम2’ रणगाडे पुरविणार आहे. हे रणगाडे रशियाच्या सीमेवर धडकेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत का? त्याच्या आधीच रशियाने नाटोचे सदस्यदेश असलेल्या ब्रिटन, फ्रान्स आणि पोलंड या देशांवर हल्ले चढवावे. आवश्यकता नसेल तर ठीक, पण आवश्यकता भासल्यास या देशांवर अणुहल्ले चढविण्याची तयारीही रशियाने ठेवायला हवी. कारण तिसरे महायुद्ध सुरू झालेले आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे खंदे समर्थक असलेल्या व्लादमिर सोलोव्‌‍योव्ह यांनी म्हटले आहे.

सोलोव्‌‍योव्ह यांच्या या विधानांची गंभीर दखल पाश्चिमात्य वर्तमानपत्रांनी घेतल्याचे दिसते. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कडवे समर्थक असलेल्या सोलोव्‌‍योव्ह यांनी आपल्या नेतृत्त्वाकडे ब्रिटन, जर्मनी व पोलंड यांच्यावर हल्ले चढविण्याची मागणी केल्याची बाब पाश्चिमात्य वर्तमानपत्रांनी लक्षात आणून दिली. युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविणाऱ्या नाटोच्या सदस्यदेशांवर रशियाने अद्याप हल्ले चढविलेले नाहीत. कारण त्यांच्यावर हल्ले झाले तर नाटो व रशियामध्ये युद्ध सुरू होईल. पण आता याची पर्वा करण्याची गरजच राहिलेली नाही. कारण हे सारे देश आता आपले रणगाडे युक्रेनला पुरवून रशियाच्या विरोधात लष्करी हालचाली करू लागले आहेत. अशा परिस्थितीत रशियाने आपल्यावर थेट हल्ले होण्याची वाट पाहू नये, असे सोलोव्‌‍योव्ह यांनी सुचविले आहे.

पोलंडवर हल्लेआपल्या सीमेपर्यंत नाटोच्या सदस्यदेशांचे रणगाडे धडकेपर्यंत वाट न पाहता रशियाने ब्रिटन, फ्रान्स व पोलंडवर हल्ले चढवावे. कारण तिसरे महायुद्ध केव्हाच सुरू झालेले आहे, असा दावा सोलोव्‌‍योव्ह यांनी केला. अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांनी युक्रेनच्या लष्करी सहाय्यात वाढ केल्यानंतर, रशियन नेत्यांची भाषा अधिकाधिक आक्रमक बनू लागली असून रशियन सैन्य युक्रेनमध्ये नाटोशीच लढत असल्याचा आरोप रशियन नेते करू लागले आहे. याचे गंभीर परिणाम समोर येतील व अमेरिका आणि नाटोबरोबर रशियाचा थेट संघर्ष पेटण्याचा धोका यामुळे संभवत असल्याची जाणीव देखील रशियाने करून दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलोव्‌‍योव्ह यांनी दिलेल्या इशाऱ्याचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसते.

अमेरिका व नाटोने युक्रेनला लष्करी सहाय्य करण्याचा सपाटा लावलेला असताना, यामुळे अणुयुद्ध पेट घेईल, असा इशारा रशियाकडून सातत्याने दिला जातो. त्याचा दाखला देऊन जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी रशियाच्या विरोधात कठोर विधाने केली होती. जर रशियाने युक्रेनवर अणुहल्ला चढविलाच, तर तो साऱ्या मानवतेविरोधातील हल्ला मानला जाईल, असे फुमिओ किशिदा म्हणाले होते. त्यावर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह यांनी टीकेची झोड उठविली आहे. जपानचे पंतप्रधान बेताल विधाने करीत असल्याचे सांगून मेदवेदेव्ह यांनी जपानच्या पंतप्रधानांना त्यांच्या देशावर अमेरिकेनेच अणुबॉम्ब टाकले होते, याची आठवण करून दिली. जपानच्या पंतप्रधानांनी खरेतर अमेरिकेकडे याची भरपाई मागायला हवी होती. त्याऐवजी ते अमेरिकेला साथ देऊन रशियाला लक्ष्य करीत आहेत, असा टोला मेदवेदेव्ह यांनी लगावला आहे.

leave a reply