चीनच्या व्यापाराला फटका बसला

चीनच्या व्यापाराला फटकाबीजिंग – ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतरही चीनची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळालेले नाहीत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच निर्बंध सैल झाल्यानंतरही चीनच्या व्यापारातील घसरण कायम राहिली आहे. डिसेंबर महिन्यात चीनची निर्यात जवळपास 10 टक्क्यांनी घटली असून आयातही साडेआठ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. 2020 सालानंतरची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येते.

गेल्याच महिन्यात ‘वर्ल्ड बँके’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2022मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेची 2.7 टक्क्यांपर्यंत घसरण होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. चीनने ‘झीरो कोविड’चे धोरण शिथिल केले असले तरी अर्थव्यवस्था व दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्लाही अहवालात देण्यात आला होता. चीनच्या व्यापारासंदर्भात समोर आलेली माहिती चिनी राजवट अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यात अपयशी ठरल्याचे दाखविणारी ठरते.

जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असतानाही चीनने व्यापारातून मोठा लाभ मिळविल्याचे समोर आले होते. मात्र 2022मध्ये चीनला त्याची पुनरावृत्ती करता आलेली नाही. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल नसल्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व विश्लेषक वर्तवित आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेतील गडबडींचा फटका यावर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला बसेल, याची जाणीवही विश्लेषकांनी करुन दिली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या उलथापालथींचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणाम चिंताजनक ठरू शकतील. कारण जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे अर्थकारण जागतिक आर्थिक व्यवस्थेशी अधिक घट्टपणे जोडलेले असून अजूनही जागतिक उत्पादनाशी निगडित पुरवठा साखळीचे केंद्र चीनमध्येच आहे. अशा परिस्थितीत चीनच्या आर्थिक भवितव्याबाबत करण्यात येत असलेले भीतीदायक दावे जगाच्या चिंतेत अधिकच भर घालत आहेत.

leave a reply