युरोपमधील ‘एनर्जी क्रायसिस’चा रशियाने गैरफायदा घेतला

- अमेरिकेचा आरोप

गैरफायदावॉशिंग्टन/मॉस्को – युरोप खंडात सुरू असलेल्या ऊर्जा संकटामागे रशियाचा हात नसला तरी रशियाने त्याचा गैरफायदा उचलल्याचे दिसून येते, असा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी ऍमोस हॉकस्टेन यांनी हा आरोप केला. युरोपमधील ऊर्जा संकटाची तीव्रता कमी करण्याची संधी रशियाकडे होती, पण रशियाने तसे केले नाही, असा दावाही अमेरिकी अधिकार्‍यांनी केला.

कोरोना साथीची तीव्रता कमी होत असताना युरोपमधील अनेक देशांनी निर्बंध शिथिल करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यामुळे युरोपमधील इंधनाची मागणी वाढण्यास सुरुवात झाली. ही मागणी वाढत असतानाच इंधनाचे दर भडकल्याने काही युरोपिय देशांना अतिरिक्त इंधन खरेदी करणे शक्य झाले नाही. याचा फटका लाखो युरोपिय नागरिकांना बसल्याचे सांगण्यात येते. उद्योगक्षेत्रावरही याचे परिणाम दिसून आल्याचे समोर आले आहे.

रशिया हा युरोपला इंधन निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. युरोपिय देशांकडून करण्यात येणार्‍या इंधन आयातीपैकी ४० ते ५० टक्के आयात रशियाकडून करण्यात येते. ही परिस्थिती लक्षात घेता रशिया युरोपिय देशांना अतिरिक्त इंधनपुरवठा करून ऊर्जा संकट टाळू शकत होता, असे अमेरिकी अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

गैरफायदारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, रशिया युरोपला सहाय्य करायला तयार आहे असे जाहीर वक्तव्य केले होते. मात्र पुतिन यांच्या वक्तव्याप्रमाणे रशियाने कृती केलेली नाही, याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले. उलट रशियाकडून युरोपला होणारा पुरवठा अनियमित झाला असून इंधनवाहिनीतून इंधन उलट खेचण्यात आल्याने पुरवठा बंद करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रशिया इंधनाचा वापर शस्त्रसारखा करीत असल्याचे आरोपही होत आहेत.

रशियाच्या या हालचालींमागे ‘नॉर्ड स्ट्रीम २’ हा इंधनवाहिनी प्रकल्प असण्याची शक्यता काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली. रशिया व जर्मनीमधील हा प्रकल्प पूर्ण झाला असून इंधनपुरवठा सुरू करण्यासाठी जर्मनीकडून अंतिम परवानगी बाकी आहे. ही परवानगी मिळावी म्हणून रशिया युरोपच्या इंधनपुरवठ्याशी खेळ करीत असल्याचे दावेही करण्यात येतात. अमेरिकेचे अधिकारी हॉकस्टेन यांनीही ‘नॉर्ड स्ट्रीम २’चा उल्लेख करताना, रशिया इंधनाचा वापर शस्त्राप्रमाणे करण्याच्या खूप जवळ आहे, असा दावा केला.

मात्र रशियाने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. रशियन कंपन्यांनी युरोपबरोबर केलेल्या कराराप्रमाणे इंधन पुरविल्याचा खुलासा रशियाकडून करण्यात आला आहे.

leave a reply