आखातातील लष्करी हालचालींद्वारे अमेरिका, इस्रायलचा इराणला इशारा

इराणला इशाराजेरूसलेम – बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अमेरिकेच्या ‘बी-१बी’ बॉम्बर विमानांनी आखातातून उड्डाण केले. यावेळी इस्रायलची एफ-१५ लढाऊ विमाने अमेरिकी बॉम्बर्ससोबत होती. गेल्या महिन्याभरात अमेरिकी बॉम्बर्स व इस्रायली विमानांची या क्षेत्रातील दुसरी संयुक्त गस्त ठरते. याच सुमारास रेड सीच्या सागरी क्षेत्रात अमेरिका, इस्रायली युद्धनौकांच्या सरावात युएई आणि बाहरिनच्या विनाशिकांनी देखील सहभाग घेतला. आखाती क्षेत्रातील या हालचाली इराणच्या चिंता वाढविणार्‍या आहेत.

इस्रायलच्या संरक्षणदलाने गुरुवारी सोशल मीडियावर काही फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले. अमेरिकेच्या बी-१बी बॉम्बर्स विमानांना सोबत करणार्‍या इस्रायली हवाईदलाच्या एफ-१५ लढाऊ विमानाचे हे फोटोग्राफ्स आहेत. आखातातून उड्डाण केलेल्या अमेरिकी बॉम्बर्स तसेच केसी-१० इंधनवाहक विमानाला इस्रायलच्या लढाऊ विमानांनी साथ दिल्याचे इस्रायली संरक्षणदलाने सांगितले. हे संयुक्त उड्डाण इस्रायल व अमेरिकेतील सहकार्य दर्शविणार्‍या तसेच इस्रायल आणि आखाताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बाब असल्याचे इस्रायली संरक्षणदलाने म्हटले आहे.

गेल्या महिन्यातही अमेरिकेच्या बॉम्बर विमानाने आखातातून युरोपच्या दिशेने प्रवास केला होता. त्यावेळीही सौदी अरेबिया आणि बाहरिनच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या बॉम्बरला साथ दिली होती. पुढे अमेरिकन बॉम्बरने इस्रायलच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर इस्रायली एफ-१५नी सोबत केली होती. अमेरिकेच्या बी-१बी बॉम्बरमध्ये बंकर बस्टर बॉम्ब अर्थात भूमिगत तळ नष्ट करणारे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. इराणच्या छुप्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र केंद्रांना लक्ष्य करण्यासाठी या बॉम्बचा वापर होऊ शकतो.

अमेरिका व इस्रायलच्या विमानांची ही माहिती समोर येण्याच्या काही तास आधी रेड सीच्या क्षेत्रात अमेरिका, इस्रायल, युएई व बाहरिनच्या नौदलात लक्षवेधी सराव सुरू झाला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या नौदलाने या बहुराष्ट्रीय सरावाची माहिती जाहीर केली. या सरावात सहभागी झालेल्या युद्धनौकांचे तपशील समोर आलेले नाहीत. पण इस्रायलच्या वरिष्ठ नौदल अधिकार्‍याने या सरावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणला इशारा दिला. या क्षेत्रातील इराणच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी अमेरिका, इस्रायल, युएई व बाहरिनच्या नौदलातील हा संयुक्त सराव महत्त्वाचा असल्याचे इस्रायलच्या नौदल अधिकार्‍याने म्हटले आहे.

इराणला इशारा‘इस्रायलचे सागरी क्षेत्र, रेड सी आणि आपल्या सागरी वाहतूकीच्या स्वातंत्र्याला आव्हान देणार्‍या इराणचा प्रभाव आपल्याला रोखावा लागेल. त्यासाठी हा सराव महत्त्वाचा ठरतो’, असे इस्रायलच्या नौदल अधिकार्‍याने सांगितले. इस्रायलच्या सुरक्षेसाठी नौदलाचे कार्यक्षेत्र वाढविणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सदर अधिकार्‍याने माध्यमांशी बोलताना दिली.

आखाती क्षेत्राला युरोपशी जोडणारा रेड सी हा सागरीमार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे हे अतिशय संवदेनशील सागरी क्षेत्र बनले आहे. या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या सौदी व युएईच्या इंधनवाहू जहाजांवर हल्ले झाल्याचे समोर आले होते. तर याच सागरी क्षेत्रात इराणच्या मालवाहू जहाजावरही हल्ला झाला होता.

अवघ्या चोवीस तासात अमेरिका, इस्रायल, युएई व बाहरिन यांनी रेड सी व आखाताच्या हवाई क्षेत्रात लष्करी हालचाली करून इराणला इशारा दिल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

leave a reply