अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात करण्याच्या जपानच्या प्रस्तावामुळे चीन अस्वस्थ

अमेरिकेची अण्वस्त्रेबीजिंग – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी अमेरिकेची अण्वस्त्रे तैनात करण्यावर जपानने विचार करावा, असा सल्ला दिला होता. त्यानंतर चीनचे डोळे पांढरे झाले आहेत. अमेरिकन अण्वस्त्रांच्या आपल्या देशातील तैनातीबाबत मागणी करण्याचच्या आधी जपानने इतिहासात डोकावून पहावे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. त्याचबरोबर जपानच्या नेत्यांनी तैवानबाबत बोलताना शब्द तोलूनमापून वापरावे आणि सावधपणे कृती करावी, असे चीनने बजावले आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी गेल्या आठवड्यात रशिया-युक्रेन संघर्षावर आपली प्रतिक्रिया नोंदविली होती. चीन तैवानबाबत लष्करी आक्रमकतेचे प्रदर्शन करीत असताना अमेरिका चीनमध्ये करीत असलेल्या गुंतवणुकीवर ऍबे यांनी टीका केली होती. अमेरिकेची ही गुंतवणूक चीनचा उत्साह वाढवणारी ठरत असल्याचे ताशेरे ऍबे यांनी ओढले होते.

तर रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर चीनची आक्रमकता अधिकच वाढण्याची शक्यता ऍबे यांनी वर्तविली होती. अशा निर्णायक काळात अमेरिकेची धोरणात्मक पातळीवर धरसोडीची भूमिका चीनसाठी पोषक ठरत असल्याचा ठपका जपानच्या माजी पंतप्रधानांनी केला होता. तैवानपासून जपानचे योनागुनी बेट अवघ्या ११० किमी अंतरावर असून चीनने तैवानचा ताबा घेतलाच तर जपान देखील असुरक्षित बनेल, याकडे ऍबे यांनी अमेरिकेचे लक्ष वेधले होते.

म्हणूनच जपानच्या सुरक्षेसाठी ऍबे यांनी अमेरिकेकडे न्यूक्लिअर शेअरिंगची शिफारस केली होती. जपानने यावर गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन माजी पंतप्रधान ऍबे यांनी केले होते. यानुसार, अमेरिका आपली अण्वस्त्रे जपानमध्ये तैनात करू शकतो. चीन तसेच उत्तर कोरिया या हुकूमशाही असलेल्या अण्वस्त्रधारी शेजारी देशांपासून असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, ऍबे यांनी अमेरिकेकडे ही शिफारस केल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला होता.

पण जपानच्या या मागणीने चीनची बेचैनी वाढविली आहे. जपानचे नेते तैवानबाबत खोटी माहिती पसरवित असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तसेच अमेरिकेकडे अण्वस्त्रांच्या तैनातीची मागणी करून जपान स्वत:च्याच तीन तत्वांचे उल्लंघन करीत असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग बेंबिन यांनी केला.

अमेरिकेची अण्वस्त्रेदुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने अण्वस्त्रांचे हल्ले चढविल्यानंतर शरण आलेल्या जपानने भविष्यात अणुबॉम्बच्या वाट्याला न जाण्याचे धोरण स्वीकारले होते. जवळपास गेली आठ दशके जपान आपल्या या तत्वांवर ठाम असताना ऍबे यापासून फारकत घेत असल्याचा आरोप चीनने केला. चीनच्या सरकारी मुखपत्राने ऍबे यांच्या न्यूक्लिअर शेअरिंगच्या मागणीवर सडकून टीका केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जपानच्या सागरी व हवाई क्षेत्राजवळ चीन, उत्तर कोरिया आणि रशियाच्या प्रक्षोभक हालचाली वाढत असल्याचा आरोप जपानने केला आहे. बुधवारी रशियन लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनी होक्काइदो हवाईहद्दीजवळून प्रवास केल्यानंतर जपानने आपली विमाने रवाना केली. तर त्याआधी उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे प्रसिद्ध झाले होते. चीनच्या विनाशिकांनी जपानच्या सेंकाकू द्वीपसमुहाच्या हद्दीजवळ घुसखोरीचा प्रयत्न केला होता. याकडे जपानचे सरकार लक्ष वेधत आहेत.

leave a reply