रशिया-युक्रेन संघर्षामुळे आफ्रिकेत अन्नासाठी महायुद्ध भडकले आहे

- इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

रोम – ‘सध्या आफ्रिकेत अन्नासाठी महायुद्ध भडकले आहे. आपण हे युद्ध रोखले पाहिजे. युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर निकालात काढला नाही, तर आफ्रिकेमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल’, असा इशारा इटलीचे परराष्ट्रमंत्री लुईगी दि मायो यांनी दिला. या परिस्थितीसाठी इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाला जबाबदार धरले.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यामुळे जगभरात उपासमारी सुरू झाल्याचा आरोप पाश्चिमात्य देश व आंतरराष्ट्रीय संघटना करीत आहेत. यामुळे अविकसित आणि दुर्लक्षित देशांमध्ये उपासमारीचे चक्रीवादळ येईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. याआधीच कोरोनाचे संकट आणि अंतर्गत संघर्षामुळे सदर अविकसित देशांना उपासमारीचा सामना करावा लागत होता. पण युक्रेनच्या युद्धामुळे खतापासून ते इंधनापर्यंत आवश्यक गोष्टींची निर्यात बाधित झाली आहे व यामुळे संबंधित देशांमध्ये उपासमारीचे चक्रीवादळ धडकू शकते, असे राष्ट्रसंघाने बजावले होते.

इटलीचे परराष्ट्रमंत्री दि मायो यांनी अधिक जाहीररित्या आफ्रिकी देशांमध्ये अन्नासाठी महायुद्ध भडकल्याचे सांगून इथली परिस्थिती पुढच्या काळात अधिकच भीषण बनेल, असा इशारा दिला. याला रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन जबाबदार असल्याचा आरोप इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. ‘रशियन युद्धनौकांनी युक्रेनच्या बंदरांमध्ये तीन कोटी टनाहून अधिक अन्नधान्याची कोंडी केली आहे. ही कोंडी फोडून रशियाने युक्रेनच्या बंदरातील धान्याचा साठा मोकळा करावा. अन्यथा आफ्रिकेमधील परिस्थिती अधिकच भयावह स्वरुप धारण करील’, असे मायो यांनी बजावले.

रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्यापासून खतांच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. रशिया व युक्रेनमध्ये संघर्षबंदी घडवून अन्नसंकटाचा प्रश्न सोडविण्यासाठी तुर्की मध्यस्थी करीतआहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी तुर्कीचा दौरा केला. यावेळी रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी युक्रेनच्या बंदरातील धान्यकोठारांमधून अन्नधान्याची निर्यात करण्याची तयारी दाखविली. पण या धान्यकोठारांच्या परिसरात दुसऱ्या कुणी नाही, तर युक्रेननेच सागरी सुरुंग पेरलेले आहेत, याकडे लॅव्हरोव्ह यांनी लक्ष वेधले. हे सुरुंग निकामी करण्याची जबाबदारी रशियाची नाही, तर युक्रेनची असल्याचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावले.

गेल्या आठवड्यात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आफ्रिकन महासंघाच्या अध्यक्षांची भेट घेतली होती. यावेळी आफ्रिकेसह जगभरात निर्माण झालेल्या उपासमारीच्या संकटाला रशिया जबाबदार नाही, असे आफ्रिकन महासंघाच्या अध्यक्षांनी जाहीर केले होते. पाश्चिमात्य देशांनी रशियावरील निर्बंध मागे घेतले तर अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होईल, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली होती. मात्र त्यांची ही मागणी मान्य करण्यास युक्रेन व पाश्चिमात्य देश तयार नाहीत. त्यामुळे अन्नधान्याच्या टंचाई आणि उपासमारीच्या भेसूर बनलेल्या समस्येला रशिया नाही तर युक्रेन व पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचे रशिया जगासमोर मांडत आहे.

leave a reply