चीनचा कंबोडियामध्ये छुपा नौदलतळ

- अमेरिकेच्या दैनिकाचा दावा

नोम पेन्ह – चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपल्या लष्करी विस्तार सुरू केल्याचा आरोप तीव्र होऊ लागला आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने कंबोडियाच्या ‘रिम’ येथे नौदलतळ उभारण्यास सुरू केल्याचा दावा अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने केला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चीनच्या या लष्करी हालचालींवर चिंता व्यक्त केली. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्र अस्थिर करणारे चीनचे हे लष्करीकरण आपल्याला मान्य नसल्ाचे न्यूझीलंडने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पॅसिफिक बेटदेशांमध्ये चीन उभारीत असलेल्या लष्करी तळांवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने टीका केली होती.

2017 साली चीनने पूर्व आफ्रिकी जिबौतीबरोबर सुरक्षाविषयक करार करुन या ठिकाणी लष्करी तळ उभारला होता. तेव्हापासून जिबौतीमध्ये चीनचे लष्कर तैनात आहे. काही वर्षांपूर्वी या पूर्व आफ्रिकी देशात तैनात चिनी लष्कराने आपल्या विमानांवर लेझर रोखल्याचे आरोप अमेरिकेने केले होते. याची आठवण करून देत अमेरिकन दैनिकाने चीन आणि कंबोडियात झालेला हा सुरक्षा करार अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचा दावा केला.

आग्नेय आशियाई कंबोडियाबरोबर केलेल्या करारानुसार, चीन येथील रिम नौदलतळाच्या पुननिर्मितीत सहाय्य करणार आहे. यानंतर थायलंडचे आखात आणि साऊथ चायना सीला जोडून असणाऱ्या या नौदलतळावर चीन आपल्या विनाशिका तैनात करणार आहे. रिम येथील छुप्या तळावरच चीन ही तैनाती करणार असल्याचे अमेरिकन दैनिकाने म्हटले आहे. चीन आणि कंबोडियामध्ये याबाबत छुपा करार झाल्याचा दावा या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला.

चीनच्या अधिकाऱ्यानेच या कराराची माहिती दिल्याचे अमेरिकन दैनिकाने म्हटले आहे. पण चीन आणि कंबोडियाने सदर दैनिकातील बातमी खोडून काढली. कंबोडिया कुठल्याही देशाला आपल्या भूभागाचा लष्करासाठी वापर करू देणार नसल्याचे कंबोडियाच्या सरकारने म्हटले आहे. तर चीनने रिम नौदलतळावरील बांधकाम पुननिर्मितीशी जोडलेल्याचा दावा केला. यामुळे कंबोडियन नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी म्हटले आहे.

याआधीही चीनने अमेरिकी माध्यमांमध्ये कंबोडियातील छुप्या नौदलतळाबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या खोट्या असल्याचे जाहीर केले होते. पण कालांतराने अमेरिकेने रिम नौदलतळावरील बांधकामाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. यानंतर कंबोडियातील चीनच्या हालचालींवर जोरदार टीका झाली होती.

यावेळीही ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी कंबोडियातील चीनच्या नौदलतळावर आक्षेप घेतला. चीनच्या छुप्या कारवाया या क्षेत्राच्या चिंता वाढविणाऱ्या ठरत असल्याची टीका पंतप्रधान अल्बानीज यांनी केली. तर यामुळे या क्षेत्रातील शांती व स्थैर्य धोक्यात येईल, असा आरोप न्यूझीलंडच्या पंतप्रधान अर्डर्न यांनी केला.

दरम्यान, सॉलोमन आयलँड या पॅसिफिक बेटदेशातही चीन लष्करी तळ उभारण्याच्या तयारीत असल्याचा ठपका ऑस्ट्रेलियाने ठेवला होता. तर गेल्या आठवड्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी वनातू, किरिबाती, फिजी या देशांचा दौरा करून सॉलोमन आयलँडप्रमाणे लष्करी करार करण्याचा प्रयत्न केला होता. पण चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा अपयशी ठरल्याचा दावा केला जातो. असे असले तरी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लष्करी विस्तार करण्याच्या चीनच्या कारवाया चिंताजनक ठरत आहेत.

leave a reply