पाश्‍चिमात्य देश युक्रेनला पुरवित असलेल्या शस्त्रास्त्रांवर रशिया हल्ले चढविल

US-Secretaryवॉशिंग्टन/मॉस्को/वॉर्सा – अमेरिका-नाटो युक्रेनमधील युद्धात सहभागी होऊन रशियाशी टक्कर घेणार नाही. पण युक्रेनला या युद्धात सर्वतोपरी सहकार्य करील, असे अमेरिका व नाटो सातत्याने सांगत आहेत. यासाठी त्यांनी युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला आहे. यावर करडी नजर ठेवून असलेला रशिया कुठल्याही क्षणी या शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर हल्ले चढवू शकेल, असा दावा युरोपातील माध्यमे करीत आहेत. यासाठी त्यांनी अमेरिका व युरोपिय देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला 13 दिवस उलटले असून रशियाकडून होणारे हल्ले अधिकाधिक तीव्र होत आहेत. येत्या काही दिवसात रशिया युक्रेनची राजधानी किव्ह ताब्यात घेऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. हे ध्यानात घेऊन अमेरिका व नाटो सदस्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू केला आहे. युक्रेनच्या पश्‍चिमी सीमेनजिक असणाऱ्या पोलंडमध्ये क्षेपणास्त्रे व ग्रेनेडचा साठा असणारी विमाने दररोज दाखल होत आहेत. एका ब्रिटीश वेबसाईटने आपल्या वृत्तात युक्रेनच्या सीमाभागात दररोज 17 विमाने शस्त्रसाठा उतरवित असल्याचा दावा केला आहे.

us-ukraineपाश्‍चिमात्य देशांकडून युक्रेनला ‘जॅव्हेलिन मिसाईल्स`, ‘अँटी टँक ग्रेनेड्स`, ‘अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स` यासह रायफल्स, सशस्त्र वाहने व ड्रोन्सचा पुरवठा करण्यात येत आहे. हा शस्त्रसाठा वेगवेगळ्या मार्गांनी युक्रेनमध्ये उतरविण्यात येत आहे. युक्रेनच्या काही भागांमध्ये स्थानिक संरक्षणदलांनी रशियाची चढाई रोखल्याचे सांगण्यात येत असून त्यामागे हा व्यापक शस्त्रसाठा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. या शस्त्रांबरोबरच युक्रेनला पोलंडच्या माध्यमातून लढाऊ विमाने पुरविण्याच्या हालचालीही सुरू आहेत.

मात्र पोलंडने त्याला नकार दिला असून आपण रशियाविरोधी युद्धात थेट उतरु शकत नाही, अशी भूमिका घेतली आहे. पोलंड तसेच रोमानियामधून युक्रेनला शस्त्रसाठ्यासह इतर संरक्षणसहाय्य पुरविण्यात येत आहे. रशियाला याची जाणीव असून रशियाने दोन्ही देशांना इशारेही दिले आहेत. पुढील काळात युक्रेनच्या शेजारी देशांनी युद्धासाठी सहकार्य वाढविले तर त्यांच्यावर हल्ले चढविले जाऊ शकतात, असे रशियाने बजावले आहे. रशिया बेलारुसमध्ये तैनात यंत्रणांच्या सहाय्याने पोलंडमार्गे युक्रेनला होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावर हल्ले करु शकतो, अशी भीती अमेरिका व युरोपिय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

रशियाच्या हल्ल्यापासून नाटो बाल्टिक देशांचे संरक्षण करील – अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

वॉशिंग्टन/रिगा – रशियाच्या हल्ल्यापासून नाटो व अमेरिका बाल्टिक देशांचे संरक्षण करील, असे आश्‍वासन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिले. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री ब्लिंकन युरोपच्या दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी लाटव्हियाला भेट दिली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्लिंकन यांनी सदस्य देशांच्या भूमीचा एकएक इंच लढण्यासाठी नाटो सज्ज असल्याची ग्वाहीदेखील दिली.

रशिया युक्रेनवर हल्ले चढवून थांबणार नाही, तर पुढे बाल्टिक व इतर युरोपिय देशांवरही हल्ले चढविल, असे इशारे युरोपियन विश्‍लेषक व अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असलेल्या देशांवर पुतिन आक्रमण करतील, असे दावे करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने रशियाच्या जवळ असलेल्या नाटो देशांमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री युरोपच्या दौऱ्यावर असून बाल्टिक देशांसह इतर देशांना सुरक्षेच्या मुद्यावर आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्लिंकन यांचे वक्तव्य त्याचाच भाग ठरतो.

leave a reply