युक्रेनच्या मुद्यावरून रशिया युद्ध सुरू करणार नाही

- परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

मॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेन मुद्यावरून पाश्‍चात्य देशांशी सुरू झालेली चर्चा अपयशी ठरली असली तरी रशिया त्यावरून युद्ध सुरू करणार नाही, असा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला आहे. मात्र त्याचवेळी रशियाच्या हितसंबंधांवर झालेला हल्ला अथवा दुर्लक्षही खपवून घेणार नाही, असेही रशियाने बजावले आहे. रशियाने अमेरिका व नाटोला दिलेला ‘सिक्युरिटी पॅक्ट’चा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून या पार्श्‍वभूमीवर लॅव्हरोव्ह यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते.

युक्रेनच्या मुद्यावरून रशिया युद्ध सुरू करणार नाही - परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हरशियाने युक्रेन सीमेवरील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविली असून जवळपास सव्वा लाख जवान तैनात असल्याचे सांगण्यात येते. या तैनातीबरोबरच रशियाने बेलारुस-युक्रेन सीमाभागातही लष्करी तैनाती सुरू केल्याचे सांगण्यात येते. रशियाची ही वाढती तैनाती अमेरिका व ब्रिटनसह नाटोची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियान फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर युक्रेनवर आक्रमण करेल, अशी भीती व्यक्त केली आहे. युक्रेनच्या यंत्रणा तसेच अधिकार्‍यांनीही पुढील महिन्यात रशिया हल्ला चढवू शकतो, असे बजावले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी रशिया युद्ध सुरू करणार नाही, असे वक्तव्य केल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. ‘जर सर्व काही रशियाच्या भूमिकेवर अवलंबून असेल, तर युद्ध होणार नाही. आम्हाला युद्ध नको आहे’, असे लॅव्हरोव्ह यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. मात्र त्याचवेळी इतर कोणत्याही देशाला रशियाच्या हितसंबंधांवर हल्ला चढवू देणार नाही किंवा हितसंबंधांकडे दुर्लक्ष केलेलेही खपवून घेणार नाही, असेही लॅव्हरोव्ह यांनी मुलाखतीदरम्यान बजावले.

युक्रेनच्या मुद्यावरून रशिया युद्ध सुरू करणार नाही - परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्हदरम्यान, रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी अमेरिका व नाटोवर आण्विक हल्ल्याची क्षमता वाढवित असल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ आर्म्स कंट्रोल ऍण्ड नॉनप्रोलिफरेशन’चे संचालक व्लादिमिर येरमाकोव्ह यांनी यासंदर्भात वक्तव्य केले. ‘नाटोचे सदस्य असणार्‍या व आण्विक क्षमता नसलेल्या पाच देशांमध्ये अमेरिकेने जवळपास २०० अणुबॉम्ब ठेवले आहेत. हल्ल्यादरम्यान त्यांचा वापर करण्यासाठी आवश्यक सुविधांचीही उभारणी करण्यात आली आहे. हे अणुबॉम्ब क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने रशियावर टाकले जाऊ शकतात. त्यासाठो नाटो सदस्य देशांदरम्यान संयुक्त सरावही सुरू आहेत’, असा दावा येरमाकोव्ह यांनी केला. या सर्व हालचाली रशियाविरोधात विकसित करण्यात येणार्‍या आण्विक क्षमतेचा भाग असल्याचेही रशियन अधिकार्‍यांनी बजावले.

रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनसारखे देश पुढे सरसावले असले तरी इतर युरोपिय देश यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे समोर येत आहे. जर्मनीने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्यास नकार दिला असून जर्मन नागरिकांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात जवळपास ६० टक्के जर्मन नागरिकांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे न पुरविण्याचा सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

leave a reply