रशियाचे परराष्ट्रमंत्री भारताच्या भेटीवर येणार

नवी दिल्ली – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह येत्या काही दिवसात भारताला भेट देणार आहेत. युक्रेनच्या युद्धाला महिना उलटल्यानंतरही, या युद्धाची तीव्रता कमी झालेली नाही. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारण्यास भारताने नकार दिला होता. यासाठी अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देश भारतावर टीका करीत आहेत. अशा परिस्थितीत, रशियन परराष्ट्रमंत्र्यांची ही भारतभेट लक्षवेधी बाब ठरत आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्रीसर्जेई लॅव्हरोव्ह यांच्या या भारतभेटीबाबत काही शक्यता मांडल्या जातात. युक्रेनमधील युद्धाबाबतची परिस्थिती व युक्रेनबरोबरील शांतीचर्चेबाबतचे धोरण रशियन परराष्ट्रमंत्री भारतासमोर मांडणार असल्याचे दावे काहीजणांकडून केले जात आहेत. अमेरिका व इतर देशांनी लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे संकटात सापडलेल्या रशियन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी भारताचे सहाय्य रशियाला अपेक्षित आहे. या सहकार्यासाठी परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह भारतात येत असल्याची चर्चा आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्रीअमेरिकेने रशियाच्या डॉलरच्या वापरावर निर्बंध टाकलेले असताना, रुपया व रुबल या भारत आणि रशियाच्या चलनामध्ये व्यवहार करण्याचा प्रस्ताव यावेळी लॅव्हरोव्ह देतील, अशी शक्यताही वर्तविली जाते. मात्र इंधन राज्यमंत्री रामेश्‍वर तेली यांनी भारत रशियाकडून रुपयामध्ये इंधनाची खरेदी करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. इंधनाचे व्यवहार रुपयांमध्ये करण्याचा भारताचा विचार नसल्याचे रामेश्‍वर तेली यांनी राज्यभेत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

रशियाकडूनही असा प्रस्ताव भारतीय कंपन्यांना मिळालेला नाही, असा खुलासा तेली यांनी केला. भारताच्या ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन-आयओसी`ने रशियाकडून सवलतीच्या दरात सुमारे 30 लाख बॅरल्स इतके इंधन तेल खरेदी केले होते. त्यापाठोपाठ आता ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन-एचपीसीएल`ने देखील रशियाकडून 20 लाख बॅरल्स इतक्या प्रमाणात इंधनतेलाची खरेदी केल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे भारत रशियाकडून इंधनाची खरेदी वाढवित असल्याचे उघड झाले आहे. यामुळे रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या भारतभेटीचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसते आहे.

leave a reply