रशियाच्या ‘कॅव्हकाझ-२०२०’ लष्करी सरावात चीनसह इराण व पाकिस्तानचा सहभाग

मॉस्को – रशियाकडून ‘कॅव्हकाझ-२०२०’ या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले असून त्यात चीनसह इराण व पाकिस्तानही सहभागी होणार आहेत. चीनचा या सरावातील सहभाग म्हणजे रशिया-चीन सामरिक भागीदारीचा नवा टप्पा असल्याचा असल्याचा दावा चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. भारताने या सरावात सहभागी होण्यास नकार दिला असून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लष्करी पथक धाडणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

रशियाच्या 'कॅव्हकाझ-२०२०' लष्करी सरावात चीनसह इराण व पाकिस्तानचा सहभागरशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोइगु यांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सरावाबाबत माहिती दिली. २१ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ‘कॅव्हकाझ-२०२०’ सराव पार पडणार असून, त्यात रशियासह १० देशांचा सहभाग असणार आहे. त्याव्यतिरिक्त नऊ देश निरीक्षक म्हणून सामील होणार असून आपले प्रतिनिधी धाडणार आहेत. सरावात सहभागी होणाऱ्या देशांमध्ये चीन, इराण, पाकिस्तान, कझाकस्तान, बेलारुस, आर्मेनिया, म्यानमार, साऊथ ऑसेटिया, अब्खाझिया या देशांचा सहभाग आहे.

रशियाच्या 'कॅव्हकाझ-२०२०' लष्करी सरावात चीनसह इराण व पाकिस्तानचा सहभागचीनच्या संरक्षण मंत्रालयाने या सरावा संदर्भात स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात हा सराव चीन-रशिया संबंधांसाठी महत्त्वाचा क्षण असल्याचा दावा केला आहे. ‘रशिया होणारा सराव इतर कोणत्याही देशाला लक्ष्य करणारा नाही. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनचा या सरावातील सहभाग, दोन देशांमधील सामरिक भागीदारी अधिक मजबूत करणारा तसेच द्विपक्षीय सहकार्याचा नवा टप्पा ठरेल’, चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून सुरू असलेल्या कारवायांना जगभरातून वाढता विरोध होत आहे. अमेरिकेसह युरोप व आशियाई देशही चीनविरोधात आवाज उठवित आहेत. अशा स्थितीत चीन रशियासारख्या जुन्या व पारंपरिक मित्रदेशाशी असलेल्या संबंधाना टिकवण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे चीनसाठी रशियाबरोबरील बहुराष्ट्रीय सरावही अतिशय महत्त्वाचा ठरल्याचे दिसत आहे.

leave a reply