रशियन राष्ट्राध्यक्ष युक्रेनमध्ये दीर्घकालिन युद्धाच्या तयारीत

- अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अध्यक्षांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘पूर्व युक्रेनमधील डोन्बास जिंकल्यानंतरही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन युक्रेनमधील युद्ध संपविणार नाहीत. रशियन राष्ट्राध्यक्ष युक्रेनमध्ये दीर्घकालिन युद्धाची तयारी करीत आहेत. मोल्दोवोतील फुटीर प्रांत ट्रान्सनिस्ट्रियापर्यंत पूल उभारण्याचे संकेत रशियन लष्कर देत आहे’, असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या अध्यक्षा एव्हरील हेन्स यांनी दिला. दरम्यान, रशियन लष्कराने युक्रेनच्या पूर्वेकडील ओडेसा भागात भीषण हल्ले चढविले. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अध्यक्षांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर रशियाने हे हल्ले चढविल्याचा आरोप युक्रेनच्या लष्कराने केला आहे.

राजधानी किव्हवर ताबा मिळविण्यात रशियन लष्कराला अपयश मिळाल्याचा दावा युक्रेनचे सरकार करीत आहे. पण किव्ह जिंकणे ही काही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची प्राथमिकता नाही, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख हेन्स यांनी स्पष्ट केले. रशियन राष्ट्राध्यक्षांनी अल्पकालिन यशासाठी युक्रेनमध्ये युद्ध छेडलेले नाही. तर दीर्घकाळासाठी युक्रेनचे युद्ध सुरू रहावे, ही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची योजना असल्याचा दावा हेन्स यांनी केला.

युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम छेडल्याची घोषणा रशियन राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी केली होती, याकडे हेन्स यांनी लक्ष वेधले. तसेच रशियाच्या सीमेजवळील डोन्बास, डोनेस्क आणि लुहान्स्क या प्रांतांना युक्रेनपासून स्वतंत्र करण्याचे संकेत रशियाने दिले होते. याचा दाखला देऊन अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अध्यक्षांनी रशियन राष्ट्राध्यक्ष आपल्या योजनेनुसार हे युद्ध खेळत असल्याचा दावा केला.

डोन्बासमधील उद्दिष्टे साध्य केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनमधील संघर्ष दीर्घकाळ सुरू ठेवण्याच्या तयारीत आहेत. काळ सरत जाईल तसा पाश्चिमात्य देशांचा युक्रेनमधील प्रतिकार कमी होईल असा पुतिन यांचा तर्क असल्याचे हेन्स म्हणाल्या. पण पुतिन यांची महत्त्वाकांक्षा आणि रशियन लष्कराची सध्याची क्षमता यात ताळमेळ नसल्याचे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही महिने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अंदाज घेणे अवघड होऊन बसेल आणि संघर्ष अधिक तीव्र होईल, असे हेन्स यांनी स्पष्ट केले.

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी देखील युक्रेनमधील युद्ध दीर्घकाळ चालण्याचा इशारा दिला. हे युद्ध रशिया किंवा युक्रेन, कुणीही जिंकणार नसल्याचे लेफ्टनंट जनरल बेरियर म्हणाले. अमेरिका व पाश्चिमात्य देश रशियाविरोधी युद्धासाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे तसेचआर्थिक सहाय्य पुरवित आहे. तरी देखील युक्रेन हे युद्ध जिंकू शकत नाही, या लेफ्टनंट जनरल बेरियर यांच्या विधानांवर अमेरिकन माध्यमे आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

युक्रेनच्याही पलिकडे रशियन लष्कराच्या कारवाया सुरू असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. युक्रेनच्या नैॠत्येकडील मोल्दोवोच्या भागातही रशिया समर्थक गट आक्रमक बनल्याच्या बातम्या येत आहेत. येथील ट्रान्सनिस्ट्रियामध्ये संशयास्पद स्फोटांची नोंद केली जात आहे. तर रशियन लष्कर देखील ट्रान्सनिस्ट्रियावर नियंत्रण मिळविण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकन माध्यमे करीत आहेत.

leave a reply