रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून चेचेन नेते कादिरोव्ह यांची कर्नल पदावर नियुक्ती

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चेचेन रिपब्लिकचे प्रमुख रमझान कादिरोव्ह यांची रशियन लष्करातील कर्नल पदावर नियुक्ती केली आहे. गेल्याच महिन्यात कादिरोव्ह यांनी रशियन लष्कराच्या खार्किव्हमधील माघारीवर टीकास्त्र सोडून धोरण बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर चेचेन रिपब्लिकमधील दोन बटालियन युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांतात तैनात करीत असल्याचेही जाहीर केले होते. आपल्या तिन्ही मुलांना युक्रेन आघाडीवर लढाईसाठी पाठवित असल्याचा दावाही कादिरोव्ह यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना रशियन लष्करातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद देण्याचा निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो.

गेल्या काही दिवसात रशियाला युक्रेनमधील खार्किव्ह तसेच लिमनमधून माघार घेणे भाग पाडले होते. ही माघारी सुरू असतानाच रशियाने युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये सार्वमत घेऊन ते प्रांत रशियात विलिन झाल्याचे जाहीर केले होते. रशियाचा भाग बनलेल्या युक्रेनी प्रांतांच्या सुरक्षेसाठी रशिया संपूर्ण शक्ती पणाला लावेल, असा इशाराही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला होता. रशियाने युक्रेनमधील मोहिमेसाठी तीन लाख अतिरिक्त जवानांच्या तैनातीची प्रक्रियाही सुरू केली होती. खार्किव्हमधील माघारीनंतर रशियाने मोठे क्षेपणास्त्रहल्ले चढवून युक्रेनला संभाव्य परिणामांबाबत बजावले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेन मोहिमेची फेररचना करीत असल्याचे संकेत या घटनांमधून मिळत असल्याचा दावा काही विश्लेषकांनी केला होता.

राष्ट्राध्यक्ष पुतिन व त्यांच्या युक्रेनमधील मोहिमेचे कट्टर समर्थक असणाऱ्या कादिरोव्ह यांना लष्करात दिलेली बढती त्याचाच भाग दिसत आहे. चेचेन रिपब्लिकचे प्रमुख असलेल्या कादिरोव्ह यांना 2020 साली रशियन लष्करात मेजरचा हुद्दा देण्यात आला होता. युक्रेन मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर मार्च महिन्यात त्यांची लेफ्टनंट म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता कर्नल पदावर बढती देऊन कादिरोव्ह यांना युक्रेन मोहिमेत अधिक सक्रिय करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी विशेष आदेशाद्वारे आपली कर्नल म्हणून नियुक्ती केली असून ही बढती आपला सन्मान असल्याचे कादिरोव्ह यांनी म्हटले आहे. युक्रेनमधील विशेष लष्करी मोहीम झटपट संपविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, अशा शब्दात त्यांनी युक्रेन संघर्षातील आपली भूमिका अधोरेखित केली. युक्रेन संघर्षात चेचेन लष्कराच्या तुकड्या आधीपासूनच सहभागी असून त्याचे काही फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. गेल्याच महिन्यात चेचेन लष्कराच्या दोन बटालियन डोनेत्स्कसाठी तैनात करण्यात येत असल्याचे कादिरोव्ह यांनी जाहीर केले होते. कादिरोव्ह यांचा ‘मिलिशिआ’ म्हणून ओळखण्यात येणारी तुकडीही युक्रेन संघर्षात सामील असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, युक्रेनला सातत्याने करण्यात येणारा शस्त्रपुरवठा रशिया व पाश्चिमात्य देशांमधील थेट लष्करी संघर्षाला चिथावणी देणारा ठरु शकतो, असा इशारा रशियाचे राजदूत ॲनातोली ॲन्तानोव्ह यांनी दिला. अमेरिकेकडून युक्रेनला पुरविण्यात येणाऱ्या मोठ्या व प्रगत संरक्षणयंत्रणा अमेरिका या संघर्षात थेट सहभागी असल्याचे सिद्ध करतात. अमेरिकेच्या या सहाय्यामुळे युक्रेन संघर्षातील रक्तपात व जीवितहानी अधिकच वाढेल, असे ॲन्तानोव्ह यांनी बजावले. रशियन राजदूत अमेरिकेला इशारा देत असतानाच अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पुतिन यांची राजवट उलथवून टाकण्याची मागणी केली आहे. रशियातील राजवट बदलल्याशिवाय युरोपात शांतता व सुरक्षा प्रस्थापित होणार नाही, असे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची निकटवर्तिय दारिआ दुगिनच्या हत्येमागे युक्रेनचा हात – अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचा दावा

वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सल्लागार अलेक्झांडर दुगिन यांची मुलगी दारिआ दुगिन हिच्या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला. युक्रेन सरकारमधील एका गटाने दारिआच्या हत्येच्या योजनेला मान्यता दिल्याचे अमेरिकी यंत्रणांनी आपल्या निष्कर्षात नोंदविले आहे. अमेरिकेतील आघाडीच्या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. युक्र्रेनने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

शनिवार 20 ऑगस्ट रोजी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दारिआ दुगिनच्या गाडीत स्फोट घडवून तिची हत्या करण्यात आली होती. स्फोटाचे खरे लक्ष्य तिचे वडील अलेक्झांडरच होते, असे सांगण्यात येते. मात्र ऐनवेळेला गाडीची अदलाबदल झाल्याने दारिआचा बळी गेल्याचे मानले जाते.

दारिआ दुगिन यांच्या हत्येमागे युक्रेनी यंत्रणांचा हात असल्याचा दावा रशियाने केला होता. अलेक्झांडर दुगिन व दारिआ दुगिनची हत्या करण्यासाठी युक्रेनी एजंट मॉस्कोत दाखल झाला होता. स्फोटानंतर सदर एजंटने इस्टोनिआमार्गे पळ काढल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले होते. अमेरिकी यंत्रणांच्या निष्कर्षातून याला दुजोरा मिळाल्याचे दिसते.अलेक्झांडर दुगिन हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा ‘ब्रेन’ म्हणून ओळखण्यात येतात. ‘रशियन वर्ल्ड’ या संकल्पनेचा पुरस्कार करणाऱ्या दुगिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचे सातत्याने समर्थन केले होते.

leave a reply