डोन्बास क्षेत्रातील बाखमत शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांची आगेकूच

रशियाकडून युक्रेन मोहिमेसाठी नव्या कमांडरची घोषणा

Russia Putin Military Aviationमॉस्को – डोन्बास क्षेत्रातील मोक्याच्या शहरांपैकी एक असणाऱ्या बाखमतवर ताबा मिळविण्यासाठी रशियन फौजांनी जोरदार आगेकूच केली आहे. या शहरानजिकच्या तीन मोक्याच्या ठिकाणांवर रशियन लष्कराने ताबा मिळविला आहे. बाखमत व जवळच्या परिसरात तीव्र संघर्ष सुरू असल्याचे युक्रेनच्या यंत्रणांनी मान्य केले असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही त्याला दुजोरा दिला.

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील लष्करी मोहिमेसाठी जनरल सर्जेई सुरोव्हिकिन यांची नवे प्रमुख कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. चेचेन व सिरियातील मोहिमांचा अनुभव असलेल्या जनरल सुरोव्हिकिन यांना रशियन लष्करात ‘जनरल आर्मागेडन’ म्हणून ओळखण्यात येते. खार्किव्ह, लिमन तसेच खेर्सनमध्ये मिळालेल्या सामरिक यशानंतर युक्रेनी राजवट अधिक आक्रमक होत असल्याचे दिसून आले होते. रशियाशी चर्चेचे मार्ग बंद करण्याची घोषणा, नाटोकडे रशियावर हल्ल्याबाबत केलेली मागणी व क्रिमिआ ब्रिजवर घडविलेला घातपात यातून युक्रेनची ही वाढती आक्रमकता दिसून आली होती. युक्रेन टोकाची भूमिका घेत असतानाच रशिया काही अंशी मागे पडत असल्याचे चित्र पाश्चिमात्य माध्यमांनी उभे केले होते. रशियातील काही माध्यमे, सोशल मीडिया तसेच विश्लेषकांच्या वक्तव्यातून रशियाच्या पिछाडीला दुजोरा मिळाला होता.

Donetsk Battle Mapया पार्श्वभूमीवर झॅपोरिझिआमधील क्षेपणास्त्रहल्ले, बाखमतजवळ सुरू असलेली आगेकूच व नव्या कमांडरची नियुक्ती या घटना रशियन मोहिमेतील फेररचनेचे संकेत देणाऱ्या ठरतात. झॅपोरिझिआ प्रांत रशियाने आपल्यात विलिन करून घेतला असला तरी त्याचा जाही भाग अद्याप युक्रेनच्या नियंत्रणाखाली आहे. यात झॅपोरिझिआ शहराचा समावेश आहे. रविवारी रशियाने या शहरावर तब्बल 20हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यात क्रूझ क्षेपणास्त्रांसह ‘एस-300’ यंत्रणेतील क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या हल्ल्यासाठी रशियाने लढाऊ विमानांचा वापर केल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

दुसऱ्या बाजूला रशियाने डोन्बासचा भाग असलेल्या डोनेत्स्क प्रांतातील बाखमत शहराच्या दिशेने आगेकूच करण्यात यश मिळविले आहे. 6 व 7 ऑक्टोबर या दोन दिवसात रशियन फौजांनी बाखमतनजिकची तीन मोक्याची ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. बाखमत शहरावरील ताब्यासाठी तीव्र संघर्षाला सुरुवात झाली असून युक्रेनी तुकड्यांना शहराचा बचाव करणे कठीण जात असल्याचे समोर आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याला दुजोरा दिला असून प्रखर लढाई सुरू असल्याचे सांगितले. बाखमत शहर डोनेत्स्क व राजधानी किव्हला जोडणाऱ्या महामार्गाचा भाग असल्याने महत्त्वाचे मानले जाते.

दरम्यान, शनिवारी रशियाने युक्रेनमधील विशेष मोहिमेसाठी नव्या अधिकाऱ्यांची कमांडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. जनरल सर्जेई सुरोव्हिकिन असे या अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांच्याकडे सध्या रशियाच्या ‘एरोस्पेस फोर्सेस’चे प्रमुख पद आहे. युक्रेन मोहिमेदरम्यान त्यांनी दक्षिण युक्रेन तसेच लुहान्स्क प्रांतातील कारवायांचे नेतृत्त्व केले होते. त्यापूर्वी त्यांनी सिरियातील रशियन लष्करी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेप्पो शहर ताब्यात घेण्यासाठी त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांना ‘हिरो ऑफ रशिया’ हा सन्मान दिला होता. गेल्याच आठवड्यात पुतिन यांनी चेचेन नेत रमझान कादिरोव्ह यांनाही लष्करात बढती दिल्याचे समोर आले होते.

leave a reply