सुरक्षा यंत्रणांनी अमली पदार्थांच्या तस्करीचे सर्व मार्ग उद्ध्वस्त करावे

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

  • गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत 40 हजार किलो अमली पदार्थ नष्ट

अमित शहागुवाहाटी – ‘केवळ अमली पदार्थ जप्त करून देश अमली पदार्थ मुक्त होणार नाही. तर कायदा व सुरक्षेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे सर्व मार्ग बंद करण्याचे ध्येय ठेवावे’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री गुवाहाटीमध्ये ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर आयोजित एका बैठकीत सहभागी झाले होते. यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत ईशान्य भारतातील राज्यांमधून गेल्या काही महिन्यात पकडण्यात आलेला सुमारे 40 हजार किलोंचा अमली पदार्थांचा साठा जाळून नष्ट करण्यात आला.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असून आपला देश अमली पदार्थांपासून मुक्त होईल, असे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने पाहिले आहे. सर्व केंद्रीय अणि राज्यांच्या सुरक्षा व तपास यंत्रणांच्या समन्वयाने हे शक्य होऊ शकते. देशाची सुरक्षा अमली पदार्थांच्या तस्करांवरील कारवाई आणि त्यांच्या तस्करीचे सर्व मार्ग उद्ध्वस्त केल्यावरच सुनिश्चित होऊ शकते, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. तसेच शस्त्र तस्करी, घुसखोरी आणि देशविरोधी कारवायाही यासाठी हाणून पाडाव्या लागतील, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. घुसखोरी, शस्त्र तस्करी, अमली पदार्थांची तस्करी या नाण्याच्या दोन बाजू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा, आरोग्य, महसूल आणि सामाजिक विभागाने अमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या दिशेने काम करायला हवे. तस्करांविरोधात कठोर धोरण स्वीकारताना पडितांबाबत मात्र संवेदनशीलता दाखवायला हवी, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

leave a reply