सौदी अरेबिया अब्राहम करारातील महत्त्वाचा भागीदार देश ठरू शकतो

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

भागीदार देशवॉशिंग्टन – आखातातील कट्टरवाद आणि इराणपासून मिळणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सौदी अरेबिया अमेरिकेचा महत्त्वपूर्ण भागीदार देश आहे. त्याचबरोबर इस्रायल व शेजारी अरब देशांमध्ये पार पडलेल्या अब्राहम कराराच्या विस्तारातही सौदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी व्यक्त केला. या महिनाअखेरीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सौदीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील. त्या पार्श्वभूमीवर, अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी ही विधाने केल्याचे दिसत आहे.

अमेरिकी मासिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी अब्राहम करारात सहभागी सदस्यांची संख्या वाढविण्याची घोषणा केली. सौदी अरेबियाने देखील या करारात सहभागी व्हावे, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले. तसेच इराणविरोधी आघाडीतही सौदीचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन देखील या सहकार्यासाठी उत्सूक असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

भागीदार देशगेल्या काही दिवसांपासून बायडेन प्रशासन इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये मध्यस्थी करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्याच आठवड्यात रेड सीच्या क्षेत्रातील सनाफिर आणि तिरान या बेटांच्या मुद्यावर अमेरिका इस्रायल व सौदीत चर्चा घडवून आणत असल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला होता. तर इस्रायल व सौदीमध्ये थेट विमानसेवा सुरू होण्यासाठीही हालचाली सुरू असल्याचे अमेरिकी वृत्तसंस्थेने म्हटले होते.

2020 साली इस्रायलने युएई आणि बाहरिन या अरब देशांबरोबर अब्राहम करार केला होता. पुढच्या काळात आणखी काही आखाती देश या करारात सहभागी होऊ शकतात, अशी घोषणा इस्रायलने केली. तर सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देखील इस्रायल हा शत्रूदेश नसल्याचे जाहीर केले होते. बायडेन प्रशासनाने सौदी अरेबिया व आखातातील इतर मित्रदेशांच्या मागण्या धुडकावून इराणला झुकते माप दिल्यामुळे सौदी व सौदीच्या नेतृत्त्वाखाली इतर आखाती देश इस्रायलशी सहकार्य करू लागल्याचे उघड झाले होते. पुढच्या काळात अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील आणि याने आखातातील अमेरिकेचा प्रभाव संपुष्टात येईल, असे इशारे विश्लेषकांनी दिले हेोते. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या बाजूने उभे न राहण्याचा आखाती देशांनी घेतलेला निर्णय ही बाब अधोरेखित करीत आहे. यामुळे बायडेन प्रशासनाला जाग आली असून राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीच्या भेटीवर यायला तयार झाले आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यानंतरही सौदी एकाएकीआपली भूमिका बदलणार नाही, असे संकेत आत्तापासूनच मिळू लागले आहेत.

leave a reply