युरोपिय देशांनी रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या विमानाला परवानगी नाकारली

-परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांची सर्बिया भेट रद्द

Sergei Lavrov मॉस्को/बेलग्रेड – युरोपिय देशांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्या विमानाला हवाईहद्द नाकारल्याचे उघड झाले. या घटनेमुळे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांना आपला सर्बिया दौरा रद्द करावा लागला. रशिया व सर्बिया या दोन्ही देशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर रशियाच्या वरिष्ठ संसद सदस्यांनी युरोपिय देशांच्या आगळिकीला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.

War-in-Ukraine-countriesरशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या विशेष लष्करी कारवाईनंतर अनेक युरोपिय देशांनी रशियन विमान कंपन्यांंसाठी हवाईहद्द बंद केली होती. मात्र आतापर्यंत रशियन नेते व राजनैतिक अधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यांसाठी आडकाठी करण्यात आली नव्हती. असे असतानाही सर्बियाच्या शेजारी देशांनी रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे विमान रोखण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्या विमानाला हद्द नाकारणाऱ्या देशांमध्ये बल्गेरिया, नॉर्थ मॅसिडोनिआ व माँटेनेग्रो या देशांचा समावेश आहे.

Russian foreign minister planeरशियाकडून या बंदीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘युरोपिय देशांनी अशा प्रकारे टाकलेली बंदी अभूतपूर्व आहे. निर्णय घेणारे देश ब्रुसेल्सच्या हातातील बाहुले आहेत. पण रशिया व सर्बियामधील संबंधांमध्ये अडथळे आणण्याचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत’, असा इशारा परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी दिला. रशियाच्या परराष्ट्र विभागाने, अद्याप रशियाकडे टेलिपोर्ट करण्याचे तंत्रज्ञान आले नसल्याचा टोला लगावला आहे. तर रशिया युरोपिय देशांना खरमरीत कारवाईच्या रुपात प्रत्युत्तर देईल, असे रशियाच्या संसद सदस्यांनी बजावले आहे.

काही दिवसांपूर्वीच सर्बियाने रशियाबरोबरील इंधनकराराला तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे युरोपिय महासंघ अस्वस्थ असून महासंघाच्या नेत्यांनी सर्बियावर टीकास्त्र सोडले होते. सर्बिया महासंघाचा सदस्य नसला तरी त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असल्याने तो महासंघाच्या गटातील देश म्हणून ओळखला जातो. अशा पार्श्वभूमीवर सर्बियाने रशियाच्या कलाने घेतलेले निर्णय महासंघाला अडचणीत आणणारे ठरतात. त्यामुळेच युरोपिय देशांकडून रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या विमानाला रोखण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

leave a reply