सौदी अरेबिया अणुऊर्जा निर्मितीला प्राधान्य देणार

ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान

Future-Minerals-Forumरियाध – सौदी अरेबियात युरेनियमचे मोठे साठे मिळाले असून त्याचा वापर करून सौदी अणुऊर्जा निर्मितीला प्राधान्य देईल, असे सौदीचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ प्रिन्स सलमान यांनी सांगितले. ऊर्जा क्षेत्रात वेगवेगळ्या पर्यायांवर काम सुरू असून अणुऊर्जाही त्याचाच भाग असेल, असा दावाही त्यांनी पुढे केला. आखाती देशांमध्ये इराण व इस्रायलव्यतिरिक्त संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे.

इराणने अण्वस्त्र विकसित करण्यासाठी मोठा पल्ला गाठल्याचे दावे इस्रायल व इतर देशांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियानेही अणुकार्यक्रम राबविण्याचे संकेत दिले असून त्यासाठी चीन, रशिया, पाकिस्तान यासारख्या विविध देशांशी बोलणी सुरू असल्याचे दावे केले जातात. काही महिन्यांपूर्वी चीन सौदी अरेबियाला ‘न्यूक्लिअर कॅपेबल बॅलेस्टिक मिसाईल’ विकसित करण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देशाची कच्चे तेल व नैसर्गिक इंधनवायूवर आधारलेली अर्थव्यवस्था बदलण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाठी हरित ऊर्जा व प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्याचवेळी अणुऊर्जा हा धोरणात्मक बदलाचा भाग असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. सौदीत युरेनियमचा किती साठा आहे, याची माहिती देण्यात आली नसली तरी अणुऊर्जा क्षेत्र विकसित करण्यासाठी पुरेसा साठा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

leave a reply