रशिया-युक्रेन संघर्षाच्या भवितव्यावरून चीनच्या सत्ताधारी वर्तुळात अस्वस्थता वाढली

china_russia_flagsबीजिंग/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन प्रतिस्पर्ध्यांचे दावे चुकीचे ठरल्याची ग्वाही देत असतानाच रशियाचा मित्रदेश असलेल्या चीनमध्ये अस्वस्थता वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा उल्लेख ‘क्रेझी’ असा करून युक्रेनमधील संघर्षात रशिया अपयशी ठरण्याची भीती चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. चीनने रशियाचा जास्त अनुनय करु नये, असा इशाराही काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त पाश्चिमात्य माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.

‘युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय रशियाच्या सत्ताधारी राजवटीतील मोजक्या लोकांच्या गटाने घेतला होता. या मुद्यावर चीनने रशियाचे समर्थन करण्याची गरज नाही’, असे एका वरिष्ठ चिनी अधिकाऱ्याने बजावले. चीनकडून परराष्ट्र धोरणात बदल करण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे संकेत काही चिनी विश्लेषकांनी दिले आहेत. पुढील काळात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पुतिन व युक्रेन युद्धापासून स्वतःला लांब करण्याचा प्रयत्न करतील, असेही सांगण्यात येते.

Draft-Ukraineब्रिटनच्या ‘द फायनान्शिअल टाईम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. चीनच्या सत्ताधारी वर्तुळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देत असल्याचेही ब्रिटीश दैनिकाने म्हटले आहे. रशियाची युक्रेनमधील मोहीम अपयशी ठरेल व रशियाचा जागतिक स्तरावरील प्रभाव कमी होऊन त्याचे स्थान ‘मायनर पॉवर’ इतकेच राहिल, असा दावा काही चिनी अधिकाऱ्यांनी केला. ही बाब लक्षात घेऊन चीनने रशियाशी असलेले संबंध मर्यादित ठेवावेत, असा सल्लाही देण्यात येत आहे.

गेल्याच महिन्यात रशिया व चीनच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान फोनवरून दीर्घकालिन चर्चा झाली होती. यात दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी दोन देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्याची ग्वाहीदेखील दिली होती. पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना 2023 साली मॉस्कोत येण्याचे निमंत्रणाही दिल्याचे दावे करण्यात आले होते. द्विपक्षीय व्यापार व इतर आर्थिक पातळ्यांवर रशिया व चीनमधील सहकार्य अधिक भक्कम होत असल्याचे दावे दोन्ही देशांच्या सरकारी माध्यमांकडून करण्यात आले होते. अमेरिकेतील काही माजी अधिकारी तसेच तज्ज्ञांनी रशिया चीनच्या अधिक जवळ जात असल्याचे इशारेही दिले होते.

या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या दैनिकाने दिलेले वृत्त लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply