सौदीचे क्राऊन प्रिन्स अरब देशांच्या दौर्‍यावर

रियाध – व्हिएन्ना येथे अमेरिका व इराण अणुकराराबाबत वाटाघाटी करीत असताना, आखातातील राजकीय घडामोडींनी वेग पकडला. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अरब मित्रदेशांच्या दौर्‍यावर रवाना झाले आहेत. इराणचा वादग्रस्त अणुकार्यक्रम हा क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्या या आखात दौर्‍याचा प्रमुख मुद्दा असल्याची चर्चा आहे.

सौदीचे क्राऊन प्रिन्स अरब देशांच्या दौर्‍यावरओमानला भेट देऊन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपल्या अरब मित्रदेशांच्या दौर्‍याची सुरुवात केली. यानंतर प्रिन्स मोहम्मद बाहरिन, कतार आणि कुवैत या देशांचा दौरा करणार असल्याचे सांगितले जाते. ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’च्या सहा सदस्य देशांमधील मतभेद कमी करून सहकार्य वाढविण्यासाठी सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी या दौर्‍याचे आयोजन केले आहे. मात्र क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान युएईच्या दौर्‍यावर जाणार का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण सौदीचे राजे सलमान यांनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायद अल नह्यान यांना पत्राद्वारे संदेश दिला आहे.

दरम्यान, इराणचा अणुकार्यक्रम तसेच येमेनमधील हौथी बंडखोरांपासून असलेला धोका यावर सौदीचे क्राऊन प्रिन्स अरब मित्रदेशांशी चर्चा करणार असल्याची माहिती संबंधितांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली.

leave a reply