देशातील अठरा वर्षांवरील ५० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली – देशात कोरोनावरील लसीकरण वेगाने सुरू असून दरदिवशी ७५ ते ८० लाख जणांना लसीचे डोस दिले जात आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी ५० टक्के जणांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत. सोमवारी हा टप्पा भारताने ओलांडला. तसेच ८५ टक्के नागरिकांना लसीचा एकतरी डोस मिळालेला आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येचा विचार करताना कोरोना लसीकरणाच्या आघाडीवर भारताने पार केलेला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरतो.

भारतात आतापर्यंत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत १२८ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. ८० कोटीहून अधिक जणांना एक डोस मिळालेला आहे. तर सुमारे ४८ कोटी जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. देशात सध्या १८ वर्षावरील नागरिकांचेच लसीकरण सुरू आहे. यानुसार पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्के जणांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. रविवारी हा टप्पा ओलांडला गेला, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी जाहीर केले.

देशातील अठरा वर्षांवरील ५० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्णतसेच लसीकरणास पात्र लोकसंख्येपैकी ८५ टक्के जणांना लसीचा एकतरी डोस मिळालेला आहे, असे मंडाविया म्हणाले. देशात कोरोनाच्या लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून झाली होती. सुरुवातीला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर्स याचे लसीकरण सुरू करण्यात आले. तर मार्चपासून जेष्ठ नागरिकांच्या, तर एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली होती. तर चौथ्या टप्प्यात मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. जुलैपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची मोहिमेला वेग देण्यात आला होता. २१ ऑक्टोबरला १०० कोटी लस देण्याचा महत्त्वाचा टप्पा या मोहिमेत ओलांडला गेला होता. तर एकाच दिवसात अडीच कोटी लसीचे डोस देण्याचा जागतिक विक्रमही भारताने रचला आहे.

देशात सध्या कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याची संख्या घटली आहे, तसेच मृत्यूदरही कमी झाला आहे. यासाठी लसीकरण हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. काही राज्यांमध्ये पॉझिटिव्ह दर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे संकटही उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत लस न घेतलेल्या नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्येच्या संपूर्ण लसीकरणाचा टप्पा ओलांडल्यावर आनंद व्यक्त केला आहे. हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आपण ओलांडला आहे. ही गती अशीच कायम राखू आणि कोरोनाविरोधातील आपली लढाई अधिकाधिक मजबूत करू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक उपयांचे पालक करत रहा, असे आवाहनही पंतप्रधानांनी जनतेला केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांना लसीकरण मोहिमेसाठी आतापर्यंत १३९ कोटी लसी केंद्र सरकारकडून पुरविण्यात आल्या आहेत. तर राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडे न वापरलेल्या अजून २१ कोटी लसी शिल्लक आहेत.

leave a reply