अरब देशांवर दोषारोप करणार्‍या पॅलेस्टिनी नेत्यांची सौदीकडून कानउघडणी

रियाध/गाझा – पॅलेस्टाईनच्या नेत्यांनी गेल्या ७० वर्षात इस्रायलशी वाटाघाटी करण्याच्या संध्या गमावल्या. या काळात पॅलेस्टिनी नेत्यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त व इतर अरब देशांकडून मोठे सहाय्य स्वीकारले. पण आता हेच पॅलेस्टिनी नेते सौदीचे शत्रू देश असलेल्या इराण आणि तुर्कीचे सहाय्य घेऊन सौदी व इतर अरब देशांवर दोषारोप करीत आहेत. पॅलेस्टाईनच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या या पॅलेस्टिनी नेत्यांचे अरब देशांवरचे दोषारोप सहन केले जाणार नाहीत, अशी जळजळीत टीका सौदी अरेबियाचे माजी गुप्तहेर प्रमुख प्रिन्स बंदार बिन सुलतान बिन अब्दुलअझीझ यांनी केली. प्रिन्स बंदार यांनी पॅलेस्टिनी नेत्यांवर केलेल्या या टीकेवर अरब देशांमधून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दोषारोप

सौदी अरेबियाचे अमेरिकेतील माजी राजदूत, सौदीच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख आणि सौदीच्या राजघराण्यातील प्रभावी व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रिन्स बंदार बिन सुलतान यांनी काही दिवसांपूर्वी एका अरबी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीचे अंश टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध झाले असून यामध्ये प्रिन्स बंदार यांनी पॅलेस्टिनी नेत्यांवर तोफ डागली. पॅलेस्टाईनसाठी सुरू असलेला लढा हा पूर्णपणे न्याय्य आहे. पण पॅलेस्टिनी नेते या लढ्यात कायम अपयशी ठरल्याचा ठपका प्रिन्स बंदार यांनी ठेवला. गेल्या ७० वर्षांमध्ये पॅलेस्टाईनच्या लढ्यासाठी सौदीने नेहमीच पॅलेस्टिनी नेत्यांना आर्थिक व राजकीय सहाय्य पुरविले होते. पण पॅलेस्टिनी नेत्यांनी नेहमीच सौदीकडून आर्थिक सहाय्य स्वीकारले आणि राजकीय सहाय्य व सल्ल्याकडे दुर्लक्ष केले, अशी घणाघाती टीका प्रिन्स बंदार यांनी केली.

१९४८ सालचा विभाजनाचा प्रस्ताव आणि १९७९ सालचा कॅम्प डेव्हिडचा करार, या दोन्ही घटनांवेळी स्वतंत्र पॅलेस्टाईनचा मुद्दा तडीस निघाला असता. पण पॅलेस्टिनी नेत्यांनी इस्रायलबरोबर वाटाघाटी करण्यास नकार दिला यामुळे इस्रायलला वेस्ट बँकमध्ये आपल्या वस्त्या उभारणे सोपे गेले, असे सांगून प्रिन्स बंदार यांनी पॅलेस्टिनी नेत्यांना धारेवर धरले. पॅलेस्टाईनचे माजी नेते यासेर अराफत यांच्यामध्ये कॅम्प डेव्हिडचा करार स्वीकारण्याचे धारीष्ट्य नव्हते, असेही प्रिन्स बंदार म्हणाले. त्याचबरोबर, या ७० वर्षांच्या कालावधीत पॅलेस्टिनींनी मर्यादा सोडून कारवाया केल्या, ज्यांचे समर्थन करणे शक्य नव्हते. तरीही सौदीने पॅलेस्टाईनच्या कुठल्याही गटाविरोधात न जाता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थनच केले, असे सांगून सौदीच्या प्रिन्सनी हमास, इस्लामिक जिहाद व इतर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांच्या कारवायांवर नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

महिन्याभरापूर्वी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात झालेल्या अब्राहम करारावर पॅलेस्टिनी नेत्यांनी दिलेल्या उग्र प्रतिक्रीयेचाही प्रिन्स बंदार यांनी समाचार घेतला. या कराराचा विरोध करण्यासाठी पॅलेस्टिनी संघटनांनी रस्त्यावर उतरून संयुक्त अरब अमिरातचे (युएई) क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झईद यांच्या फोटोची जाळपोळ केली होती. तसेच इस्रायलबरोबर करार करुन युएई’ने पॅलेस्टिनींच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका पॅलेस्टिनी नेत्यांनी केली होती. पॅलेस्टाईनच्या लढ्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थनाची अपेक्षा असणार्‍या नेत्यांकडून अरब देशांच्या नेतृत्त्वाविरोधात अशाप्रकारच्या हीनदर्जाच्या भाषेचा प्रयोग करणे अपेक्षित नसल्याची जाणीव प्रिन्स बंदार यांनी करुन दिली.

पॅलेस्टिनी नेत्यांनी अरब देशांकडून मिळणारे सहाय्य ग्रृहित धरले आहे. अरब देशांकडून आर्थिक सहाय्य घेणार्‍या पॅलेस्टिनींनी सौदी व अरब देशांना धमकावणार्‍या इराण व तुर्कीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आपण सौदी, सौदीचे नेतृत्त्व किंवा इतर अरब देशांच्या नेतृत्त्वाबाबत कितीही चुकीची विधाने केली तरी काही फरक पडणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नका, असा सज्जड दम प्रिन्स बंदार यांनी भरला आहे. प्रिन्स बंदार यांच्या या विधानांवर पॅलेस्टाईनमधून दबक्या आवाजात टीका होत आहे. गाझापट्टीतील हमासप्रमुख इस्माईल हनिया यांनी सौदीचा नामोल्लेख टाळून, पॅलेस्टाईनच्या लढ्याशी बेईमानी करणार्‍या अरब देशांना माफ केले जाणार नाही, अशी धमकी दिली आहे. तर प्रिन्स बंदार यांची ही टीका म्हणजे इस्रायल व युएई-बहारिन यांच्यातील कराराला सौदीचे समर्थन असल्याचे संकेत देणारे असल्याचा दावा वेस्ट बँकमधील फताहचे नेते करीत आहेत.

leave a reply