कॉमनवेल्थच्या बैठकीत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले     

नवी दिल्ली –  आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांचा भारताने चांगलाच समाचार घेतला. ”काश्मीर नाही तर आता फक्त  ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर’च चर्चा होईल. शेजारी देशाला आज ना उद्या या भागावरचा अवैध ताबा सोडावाच लागेल”, अशा कडक शब्दात भारताने पाकिस्तानचा नामोल्लेख न करता पाकिस्तानला  फटकारले.

कॉमनवेल्थ

बुधवारी कॉमनवेल्थ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत भारताकडून परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) विकास स्वरूप उपस्थित होते. पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या व्यासपीठाचा वापर करुन जम्मू आणि काश्मीरवर रडगाणे सुरु केले. त्यावर भारताने पाकिस्तानला दहशतवाद, अल्पसंख्यांकाचा छळ आणि अवैध ताब्यावरुन चांगलेच धारेवर धरले.

‘दहशतवाद्यांचा प्रायोजक कोण? हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. पण तो देश आपणच त्याचे बळी ठरत असल्याचा मुखवटा धारण करतो. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान अशी ओळख असणाऱ्या या देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघानेही मान्य केले आहे’, अशा शब्दात स्वरूप यांनी पाकिस्तानवर टीका केली.

कॉमनवेल्थ

‘दक्षिण आशियातला एक देश हे एकतर्फी धोरण निरनिराळ्या व्यासपीठांवर मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असतो. दुर्दैवाची बाब ही कॉमनवेल्थची बैठक ही या देशाने सोडली नाही. पण त्यांच्या देशातल्या ४९ वर्षांपूर्वीच्या नरसंहाराबद्धल हा देश एक चकार शब्द काढत नाही’, अशा कडक शब्दात भारताने पाकिस्तानवर प्रहार केला. हा देश स्वतःच्याच नागरिकांची हत्या करीत असल्याचे सांगून स्वरूप यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.

जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा सामना करीत आहे. हा देश मात्र आपल्याच देशातील अल्पसंख्यांकाच्या विरोधात कारवाई करण्यास व्यस्त आहे, असा शेरा स्वरूप यांनी मारला. दुसऱ्या देशांना अल्पसंख्याकांचा आदर करण्याचा उपदेश देणारा देश स्वतः च्या देशातल्या अल्पसंख्यांकाचे अधिकार पायदळी तुडवित आहे, अशी टीका स्वरूप यांनी केली.

leave a reply