वीज वाचवा नाहीतर हिवाळ्यातील संकटाला सामोरे जा

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

वीज वाचवापॅरिस – फ्रान्सच्या जनतेने आतापासूनच वीजेची बचत सुरू करायला हवी, नाहीतर हिवाळ्यात त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बजावले. रशिया इंधन निर्यातीचा युद्धातील शस्त्र म्हणून वापर करीत असून इंधनाचा पुरवठा पूर्णपणे बंद होऊ शकतो, असा आरोपही मॅक्रॉन यांनी केला. या संकटाला तोंड देण्यासाठी फ्रान्स सरकार व्यापक योजना तयार करीत असल्याचे आश्वासनही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी दिले.

वीज वाचवारशियाने युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनपुरवठा मोठ्या प्रमाणात घटविला आहे. यासाठी तांत्रिक कारणे पुढे केली असून त्याची पूर्तता झाल्यावर रशिया पुन्हा इंधनपुरवठा सुरळीत करील, असा दावा करण्यात आला आहे. मात्र रशियाच्या हालचालींनी युरोपिय देशांमध्ये चिंतेचे वातावरण असून रशिया इंधनपुरवठा पूर्णपणे थांबवू शकतो, असे इशारे देण्यात आले होते. त्यामुळे आघाडीच्या युरोपिय देशांनी आपत्कालिन योजनांवर काम सुरू केले असून जनतेलाही वीज वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी केलेले आवाहनही त्याचाच भाग ठरतो. फ्रान्स हा ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण देश म्हणून ओळखला जातो. फ्रान्समधील 70 टक्क्यांहून अधिक वीजेची गरज अणुऊर्जेच्या माध्यमातून भागविली जाते. मात्र गेल्या काही महिन्यात फ्रान्समधील अनेक अणुऊर्जा प्रकल्प देखभाल, दुरुस्ती व इतर तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. त्यामुळे फ्रान्समधील ऊर्जानिर्मिती अडचणीत आली असून नैसर्गिक इंधनवायू तसेच कच्च्या तेलाचा वापर वाढविणे भाग पडले आहे.

काही दिवसांपूर्वीच फ्रान्समधील ‘मिशेलिन’ या आघाडीच्या कंपनीचे प्रमुख फ्लॉरेंट मेनेगॉक्स यांनी, फ्रेंच उद्योगक्षेत्राने तेल व कोळशावर चालणाऱ्या यंत्रणा कार्यरत केल्याची माहिती दिली होती. तर फ्रान्समधील वरिष्ठ मंत्र्यांनी उद्योगक्षेत्राने काही काळ काम बंद ठेवण्याची तयारी ठेवावी, असे संकेत दिले आहेत.

leave a reply