पुतिन मुक्त जगाची घोषणा करणाऱ्या ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांना रशियाने फटकारले

पुतिन मुक्तमॉस्को/लंडन – ‘मी सत्तेवर आले तर जग पुतिन मुक्त करीन आणि युक्रेनचा विजय होईल’, अशी घोषणा ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस यांनी केली. यावर खवळलेल्या रशियाने ट्रूस यांची टर उडवली. त्यांनी ही कारवाई करूनच दाखवावी, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री रशियाच्या भयगंडाने पछाडलेल्या आहेत, असा टोला रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी लगावला आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांमध्ये पंतप्रधानपदासाठी स्पर्धा सुरू आहे. यासाठी या पक्षाचे नेते आपल्या समर्थकांसमोर मोठमोठ्या घोषणा करीत आहेत. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री असेलेल्या लिझ ट्रूस देखील या स्पर्धेत आहेत. ट्रूस यांनी आपली भूमिका मांडताना रशियन राष्ट्राध्यक्षांवर टीका करून ब्रिटनमधील रशियाविरोधातील जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला.

पुतिन मुक्त‘मी ब्रिटनच्या सत्तेवर आले तर, पुतिन यांच्याविरोधात ठामपणे उभी राहिन. युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारणारे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि रशियावर अत्यंत कठोर निर्बंध लादण्यात येतील’, अशी घोषणा ट्रूस यांनी यावेळी केली. ब्रिटनसह अमेरिका व इतर युरोपिय देशांनी याआधीच रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. तरी देखील त्याचा कुठलाही परिणाम रशियावर झालेला नाही. ही बाब ट्रूस लक्षात घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या दाव्यांचा त्यांना फार मोठा राजकीय फायदा मिळण्यची शक्यता सध्या तरी दिसत नाही. रशियाने ट्रूस यांच्या विधानांची खिल्ली उडविली. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री रशियाच्या भयगंडाने आणि अतिआक्रमकतेने पछाडलेल्या असल्याची टीका रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाखारोव्हा यांनी केली. तर गेल्या कित्येक शतकांमध्ये अनेकांनी अपयशी प्रयत्न केले, तसेच प्रयत्न ट्रूस यांनी देखील करून पहावेच, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाखारोव्हा यांनी म्हटले आहे.

leave a reply